पुणे | 25 डिसेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडणार असल्याचं जाहीर केलं आहे. शिरूरमध्ये उमेदवार देणार आणि तो पाडणारच, असं ओपन चॅलेंज अजितदादा यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. अजितदादा कोल्हे यांच्या मागे का लागले? असा सवालही राजकीय वर्तुळात केला जात आहे. अजितदादा यांच्या या चॅलेंजवर खासदार अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं आहे. तसेच अजितदादा यांनी संघर्ष यात्रा आणि पदयात्रांची उडवलेली खिल्ली दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी टीव्ही9 मराठीला विशेष प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अजितदादा यांच्या चॅलेंजवर भाष्य केलं. मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करत आहे. या भागाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. निवडणूक म्हणजे एकाने दुसऱ्याला आव्हान देण्याची गोष्ट नाही. ही प्रतिनिधीत्व करण्याची बाब आहे. प्रश्न मांडण्याची गोष्ट आहे. दादा हे मोठे नेते आहेत. त्यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर द्यायला मी मोठा नाही. मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करणार. मला पक्षाने तिकीट दिलं तर शंभर टक्के लढणार. मी माझ्या मतदारसंघात पाच वर्षापासून काम करत आहे. मतदारसंघात विकासकामे केली आहेत. शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
अजितदादांचं आव्हान मी ऐकलं नाही. अजितदादा मोठे आहेत. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला ते आव्हान देतील असं वाटत नाही. पण पक्षाची जी भूमिका असेल ती नक्कीच त्यांनी मांडली असेल. मी त्यांचं विधान पाहिलं नाही. शिरूरमध्ये माझ्या कामाचं त्यांनी जाहीर भाषणात कौतुक केलं आहे. संसदेतील परफॉर्मन्सचं कौतुक केलं आहे. त्यामुळे ते आता काय म्हणाले हे समजून घ्यावं लागेल, असा टोला कोल्हे यांनी लगावला.
पदयात्रा सूचण्याचा विषय नाही. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. शेतकरी संतापलेले आहेत. शेतकऱ्यांचं नुकसान किती होतंय, ही गोष्ट अजितदादांना माहीत असेल. दुधाबाबत काय परिस्थिती आहेहे ही माहीत असेल. हा विषय घेऊन पुढे जात असू शेतकऱ्यांचं म्हणणं मांडत असू तर दादांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे. ते सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारकडे कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी आमच्या सूरात सूर मिसळून शेतकऱ्यांच्या बाजूने बोललं पाहिजे. उभं राहिलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.