पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde) यांच्या नावाने गिफ्ट देण्याचा बहाणा करून पैसे उकळण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात मोबाइलधारक आरोपीने त्याच्या मोबाइल क्रमांकाच्या व्हाट्सअॅप प्रोफाइलवर आयुक्त अंकुश शिंदे यांचा फोटो आणि त्यांचे नाव वापरले. तसेच पैसे उकळण्याच्या उद्देशाने गिफ्टचे आमिष दाखवले आणि फसवणूक केली आहे. शहर आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याच व्हाट्सअॅप क्रमांकावरून पोलीस आयुक्त असल्याचे भासवून त्याने पैसे मागितले. आरोपीने पोलीस आयुक्तांच्या नावाने थेट पैसे शहरातीलच वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पैसे मागण्यात आले आहेत. मात्र अद्याप आरोपी (Accused) पकडण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना अपयश आले आहे. दरम्यान, थेट पोलीस आयुक्तांच्याच नावे गिफ्ट देण्याचा बहाणा करून पैसे उकळण्याचा प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 11 दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अज्ञात व्यक्तीने 917358921046 या नंबरवरून व्हाट्सअॅपवर मेसेज करून आपण पोलीस आयुक्त असल्याचे भासवले. गिफ्ट कार्ड देण्याच्या बहाण्याने पैसे उकळण्याच्या उद्देशाने फसवणूक केली. यासंबंधी पोलीस अंमलदार कृष्णा विजय गवळी यांनी फिर्याद दिली. कृष्णा गवळी हे सायबर सेल, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. एकूणच या प्रकारामुळे पोलिसांचे भय आरोपीस नाही, हे स्पष्ट दिसत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भा. दं. वि. कलम 419, 511, 170प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपीस अटक करण्यात आलेली नाही. ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याच्या सूचना पोलिसांकडून सामान्यांना देण्यात येतात. मात्र आता पोलिसांचीच फसवणूक होण्याचे प्रकार होत आहेत. त्यातही आरोपी पकडण्यात अपयश येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हा गंभीर प्रकार असून सबंधित आरोपी निष्पन्न झाला आहे. त्याला अटक करण्यासाठी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे अधिकारी रवाना झाले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांना यासंबंधीचे अनुभव वारंवार येताना दिसून येतात. मित्रांचे फेक प्रोफाइल बनवूनही पैसे मागण्याचे प्रकार सुरू आहेत. आता मात्र थेट पोलीस आयुक्तांच्याच नावाने सराइतपणे व्हाट्सअॅपवर प्रोफाइल तयार करून असे प्रकार केले जात आहेत. त्यामुळे आरोपींना पोलीस आयुक्त किंवा पोलिसांचे कोणतेही भय उरले नाही, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. विशेष म्हणजे आयुक्तांच्या नावाने हा प्रकार घडूनही अद्याप आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांची ही गत तर सामान्यांना न्याय कसा मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.