पुणे : कसबा पोटनिवडणुकीतला (Kasba by-election) ट्विस्ट वाढला आहे. कारण हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे (Anand Dave) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. दवे यांना निवडणूक आयोगाकडून बासरी हे चिन्ह मिळालं आहे. दवे यांनी बासरीचा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेत घुमणार असल्याचं म्हटलं आहे. आपण कसबा पोटनिवडणुकीत जिंकून येणारच, असा आनंद दवे यांना विश्वास आहे. त्यासाठीच त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने भाजपची डोकेदुखी मात्र निश्चित वाढणार आहे. कारण ब्राह्मण समाजाची मतं यामध्ये फुटण्याची दाट शक्यता आहे.
विशेष म्हणजे कसबा मतदारसंघातील ब्राह्मण समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार आहे. पण आनंद दवे यांनी या मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भविष्यातील चित्र काय असेल, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
खरंतर कसबा मतदारसंघ हा 1978 पासून भाजपचाच बालेकिल्ला आहे. येथून सतत ब्राह्मण समाजाचा उमेदवार निवडून येत आहे. पण, यावेळी येथे भाजपने भाजपचे चारवेळा नगरसेवक, दोन वेळा स्थायी समितीचे सभापती राहिलेले हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने ओबीसी समाजाचे नेते रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. यामुळे आता येथे ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत असेल.
दुसरीकडे हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवत या निवडणुकीत रंगत आणली आहे. आनंद दवे यांची उमेदवारी भाजपला डोकेदुखी ठरणार अशी चिन्हे आहेत. कारण, येथील ब्राह्मण मतदार जसा भाजपच्या पाठीशी आहे तसाच तो हिंदू महासंघासोबतही आहे.
कसबा पेठेत ब्राह्मण समाज 13 टक्के आहे, तर मराठा व कुणबी ( 23 टक्के ), इतर मागासवर्ग ( 31 टक्के ), अनुसूचित जाती ( 9 टक्के ), अनुसूचित जमाती ( 4 टक्के ), मुस्लिम आणि जैन ( 17 टक्के ) असा आहे.
याचाच अर्थ ब्राह्मण वगळता कसबा येथे मराठा आणि कुणबी समाजाचे मतदान अधिक आहे. ही आकडेवारी लक्षात घेऊनच दोन्ही पक्षांनी येथे ओबीसी उमेदवार दिला आहे. पण, ब्राह्मण समाजाची मते मात्र भाजप आणि हिंदू महासंघ अशा दोन ठिकाणी विभागला जाणार असल्यामुळे हेमंत रासने यांच्या अडचणी वाढणार आहेत.