राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी पुणे हिट अँड रन प्रकरणावरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या आरोपांना आता आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिलंय. “अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांसाठी दोन-दोनदा फोन केले होते. त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे. मी पुण्यामध्ये स्वतः त्यांच्यासह आरोपी आहे. यामुळे अजित दादांवरती टीका करणे बंद करा”, असा गौप्यस्फोट आनंद परांजपे यांनी केला.
“पुण्याला दुर्दैवी अपघात झाला आणि दोन निष्पापांचा बळी गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही चौकशी निष्पक्षपणे व्हावी, अशा सूचना दिल्या आहेत. येरवडा तुरुंगातील अधिकारी आणि ससून हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. मात्र, विरोधकांना सातत्याने महायुतीतील तीन नेत्यांवर आरोप करण्याची सवय लागली आहे. खासकरून आमदार जितेंद्र आव्हाड यांना कायम उपमुख्यमंत्री अजित पवार दिसतात”, अशी टीका आनंद परांजपे यांनी केली. आनंद परांजपे यांची हातवारे करुन जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.
“जितेंद्र आव्हाड यांनी काल अजित पवारांवर किती वेळा फोन केला, असा आरोप केला होता. मात्र अजित पवारांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, सक्त कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर 354 गुन्हा दाखल झाला तेव्हा देखील अजित पवारांनी पोलिसांना फोन लावून चौकशी नीट करा. ते न करता कसा काय गुन्हा लावता? असे विचारले होते. हे आपण विसरलात का?”, असा प्रश्न आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना विचारला आहे. “अजित पवार यांचा संबंध जोडायचा आणि अजित पवारांवर खोटी टीका करता येईल हा त्यांचा केविलवाणी प्रकार आहे”, अशी टीका आनंद परांजपे यांनी केली.
“अजित पवार यांचा ब्रह्मा बिल्डर बरोबर पण नाव जोडण्याचा प्रयत्न केला. अनधिकृत बांधकामावर आव्हाड यांना फोटोशूट करायची सवय आहे. कळवामधील शरद पवार यांचे कार्यालयदेखील अनधिकृत आहे. याचे फोटो देखील आव्हाडांनी ट्विट करावा”, असं आव्हान आनंद परांजपे यांनी आव्हाडांना दिलं.
“जितेंद्र आव्हाड यांची नेहमीची खोटे नाटे आरोप करणे ही सवय आहे. स्वतःचं ठेवावं झाकून, दुसऱ्याचा बघावं वाकून ही जितेंद्र आव्हाड यांची प्रवृत्ती. कायम द्वेषाने ते अजित पवार यांच्यावर टीका करतात. अजित पवार यांनी आव्हाड्यांसाठी दोन-दोनदा फोन केले होते. त्याचा साक्षीदार मी स्वत: आहे. एकदा पुण्यामध्ये मी स्वतः त्यांच्यासह आरोपी होतो. यामुळे अजित दादांवरती टीका करणे बंद करा”, असं आनंद परांजपे म्हणाले.