सोलापूर : राज्यात अंगणवाडी सेविकांनी (aganwadi worker )आंदोलन पुकारले आहे. अंगणवाडी सेविकांनी मानधनात वाढ, पोषण आहारचे ट्रॅकर मराठीत करणे, नवीन मोबाइल देणे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास आमदार प्रणिती शिंदे (Praneeti Shinde) यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांना राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी (Rahul gandi and narendra modi) यांच्यात काय फरक आहे, हे समजून सांगितले. भारत जोडो यात्रेमधील संदर्भ देत त्यांनी हा फरक दाखवला.
मोदींना कोणी मिठी मारणार का?
काँग्रेस नेते राहुल गांधी हे जेव्हा चालतात त्यावेळेस सर्व महिला त्यांना मिठ्या मारतात. त्यांच्या जवळ जातात. कारण सर्व महिला यांच्याकडे भाऊ म्हणून बघतात. राहुल गांधी जेव्हा भारत जोडो यात्रेत चालत होते. वयस्कर महिला तरुण महिला या राहुल गांधी यांच्या जवळ येऊन त्यांना मिठ्या मारत होत्या.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासंदर्भातही असेच होत होते. राजीव गांधी यांचा जीव महिलेमुळे गेला. कारण एक महिला आली आणि तिने राजीव गांधी यांना भावा सामान मिठी मारली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जातील तेव्हा त्यांना मिठी मारण्याची हिम्मत होईल का? दोन्ही नेत्यांमध्ये हाच फरक आहे, असा टोला आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला लगावला.
राज्यभर आंदोलन
राज्यात अंगणवाडी सेविकांनी आंदोलन पुकारले आहे. सोलापुरात आंदोलनादरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी या आंदोलनाला भेट दिली. केंद्र सरकार हे गोरगरिबांचे सरकार नाहीय. महिलांचे तर नाहीच नाही. महिलांकडे तुच्छ नजरेने पाहिले जाते. महिलांवर अन्याय करणारे हे सरकार आहे.
या सरकारकडून महिलांना न्याय मिळणार नाही. इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांची काँग्रेस सदैव तुमच्या सोबत आहे, असा विश्वास काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
काय आहेत मागण्या
मानधनात वाढ, पोषण ट्रॅकर मराठीत करणे, नवीन मोबाइल, ग्रॅच्युइटी लागू करणे, आहार व इंधनाचे दर वाढवणे, अंगणवाडीचे भाडे, थकीत देयके आदी मागण्या अंगणवाडी सेविकांच्या आहेत. या मागण्यांकडे राज्य सरकार दोन वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे. त्याच्या निषेधार्थ राज्यभरातील दोन लाख अंगणवाडी सेविका दोन दिवसांपासून आंदोलन करत आहेत.