पुणे : ‘यूँ ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती हैं’, हे वाक्य खरं करुन दाखवलंय पुण्याच्या अनिकेत साठे याने… नुकत्याच 12 डिसेंबर रोजी इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथे झालेल्या दीक्षांत संचलनात पुण्यातील तरुण अनिकेत अमरेन्द्र साठे यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. (Aniket Sathe from Pune as a Lieutenant officer in the Army)
अनिकेतच्या लेफ्टनंट पदावरील नियुक्तीने पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याची ही निवड पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्याने हे यश मिळवलं आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमध्ये दाखल होण्यापूर्वीच त्यांचे वडिल अमरेंद्र साठे यांचे निधन झाले होते. तरीही ते खचून न जाता येणाऱ्या परिस्थितीवर मात करीत त्यांनी लेफ्टनंट पदापर्यंत वाटचाल करत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
अनिकेत साठे हे कोथरुडचे रहिवासी असून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फार मोठी मजल मारली आहे. त्यांचे शिक्षण विखे पाटील मेमोरियल स्कूल येथे झाले असून महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले आहे. डिसेंम्बर 2016 मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी( NDA)च्या 137 व्या तुकडीसाठी अनिकेत साठे यांची निवड झाली होती.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीतील तीन वर्षे आणि इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथील एक वर्षाचे प्रशिक्षण अतिशय यशस्वीरित्या पूर्ण करुन आज त्याने लेफ्टनंटपद मिळवले आहे. अनिकेतच्या यशाबद्दल पुण्यातील विविध स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
(Aniket Sathe from Pune as a Lieutenant officer in the Army)
संबंधित बातमी
मित्रांचा नादच खुळा! जिवलग मित्राला नोकरी लागली, पगाराची रक्कम लिहून चौकात अभिनंदनाचा फलक