पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 8 वर्षे पूर्ण होऊनही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पकडले गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांना पकडून त्यांच्यावर खटला चालवावा, अशी मागणी दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर आणि मुलगा हमीद दाभोलकर यांनी केलीय. यावेळी त्यांनी 8 वर्षे होऊनही या प्रकरणी खटला सुरू झालेला नाही हे नमूद करत नाराजी व्यक्त केली. खटला सुरू न झाल्यानं आरोपी जामिनावर सुटत असल्याचंही निरिक्षण त्यांनी नोंदवलंय.
मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, “डॉ. दाभोलकरांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी पकडले गेले आहेत. परंतू अजूनही खटला सुरू झालेला नाही. खटला सुरू होण्यास उशीर झाला तर त्याचा फायदा आरोपींना मिळून ते जामिनावर सुटतात. या खटल्यातील आरोपी विक्रम भावे अशाप्रकारे जामिनावर सुटलेले आहेत. आम्ही त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात देखील गेलोय. त्यामुळे किमान 8 वर्षांनंतर तरी हा खटला ताबोडतोब सुरू होणं गरजेचं आहे.”
“दाभोलकरांच्या खूनानंतर गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचेही खून झाले. या सर्व खूनांचा आणि नालासोपारा येथे सापडलेला स्फोटकांचा प्रचंड साठा हे पाचही गुन्हा एकमेकांशी जोडलेले आहेत. या पाचही प्रकरणातील आरोपी आणि साक्षीदार समान आहेत. हा एका मोठ्या व्यापक कटाचा भाग आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ काही तरुण आरोपी पकडलं जाणं पुरेसं नाही. त्यांना पैसे पुरवणारं कोण आहे, हा मोठा कट तयार करणारे कोण आहेत एकूणच या संपूर्ण कटाचे सूत्रधार कोण आहेत हे समोर येणं गरजेचं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील वेळोवेळी हा व्यापक कटाचा भाग असल्याचं निरिक्षण नोंदवलंय. म्हणूनच या कटाच्या मुळांशी पोहचणं गरजेचं आहे,” असं मत मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केलं.
“आमच्या ठोस मागण्या आहेत की लवकरात लवकर खटला सुरू व्हावा. लवकरात लवकर खूनाच्या सूत्रधारांपर्यंत पोहचावं. अशाप्रकारची विचारसरणी बाहेर राहिल्यामुळे अनेक विवेकवादी लोकांच्या जीवाला धोका आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर जे अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम करत होते ते काम पुढेही सुरूच ठेवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असं मुक्ता दाभोलकर यांनी नमूद केलं.
8 वर्षांनंतरही दाभोलकर खून प्रकरणी खटला सुरू नाही, मुख्य सूत्रधारांनाही अटक नाही : हमीद दाभोलकर@Hamid_Dabholkar#HamidDabholkar #NarendraDabholkar #ANIS pic.twitter.com/yopKMrJMqT
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) August 20, 2021
हमीद दाभोलकर म्हणाले, “आज डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 8 वर्षे पूर्ण होत आहेत. पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या 8 वर्षात संशयित मारेकरी पकडण्यात सीबीआयला यश आलंय ही महत्त्वाची बाब घडलीय. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश प्रकरणातही चांगली प्रगती झालीय. संशयित मारेकरी पकडले गेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हा तपास चालल्यामुळेच तपासात ही प्रगती होऊ शकली. असं असलं तरी प्रत्यक्षात या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू झालेला नाही. या प्रकरणातील सूत्रधारही अद्याप पकडले गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर पकडावं आणि त्यांच्यावर खटला सुरू करावा.”
“मारेकऱ्यांनी डॉ. दाभोलकरांचा विचार संपवण्याचा प्रयत्न केला असला तरी ऑल इंडिया पिपल्स सायन्स नेटवर्कतर्फे आज 20 ऑगस्टला राष्ट्रीय पातळीवर वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस म्हणून साजरा केला जातो. मणिपूर, काश्मीर, आसाम, तामिळनाडू, केरळसह 20-22 राज्यांमध्ये हा दिवस साजरा होतो. हेच मारेकऱ्यांना भारतातील विवेकी जनतेनं दिलेलं उत्तर आहे,” असंही हमीद दाभोलकर यांनी नमूद केलं.