पुणे | 16 ऑक्टोंबर 2023 : पिंपरी-चिंचवड मनपाने नवीन प्रणाली नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. शहरामध्ये कोठेही झाडांच्या फांद्या, काढून टाकलेली झाडी झुडपी, बांधकामाचा राडारोडा, हॉटेल, खानावळ, मंगल कार्यालयाचे शिल्लक अन्न, खरकटे, इलेक्ट्रॉनिक कचरा दिल्यास त्याचा एक फोटो पाठवा. त्यानंतर तात्काळ तो कचरा उचलून नेला जाणार आहे. यासाठी ‘पोस्ट अ वेस्ट’ ही नवीन संकल्पना राबवण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर किंवा स्मार्ट सारथी मोबाईल अॅपवर नागरिकांनी जमा झालेल्या किंवा पडलेला कचर्याबाबत तक्रार करावी लागणार आहे.
पिंपरी चिंचवड मनपाने जलतरण तलावातील पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन गॅस वापरास बंदी घातली आहे. यापुढे केवळ क्लोरीन पावडरच वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे मनपाच्या कोणत्याही तलावात क्लोरीन गॅसचा वापर केला जाणार नाही. क्रीडा विभागाचा हा प्रस्ताव प्रशासनाने मान्य केला आहे. काही दिवसांपूर्वी कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्लोरीन गॅसची गळती होऊन 19 जणांना बाधा झाली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
पुणे येथील खेड तालुक्यातील कळमोडी धरणाची उंची 1 मीटरने वाढविणे शक्य आहे. धरणाची उंची वाढवल्यास 2.75 दलघमी जलसाठा वाढणार आहे. कळमोडी प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव सादर करावा आणि धरणाची उंची वाढविल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या जादा पाण्यातून अतिरिक्त सिंचन क्षेत्रासाठी स्वतंत्र प्रशासकीय मान्यता करावी, असा निर्णय घेण्यात आला. पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ आणि कळमोडी पाणलोट विकास संस्थेने आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय झाला.
भाताच्या आगारात भात पिकावरील कीड आणि रोगाची पाहणी कोकण पट्ट्यातील दापोली कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केली. करपा, तापकीरी तुडतुडे, पाने गुंडळणारी आळी, केसाळ अळी या किडरोगाचा प्रादुर्भाव भातावर दिसत आहे. यामुळे दापोली कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.सचिन शेळके, तसेच मावळ कृषि अधिकारी विकास गोसावी यांनी भाताच्या बांध्यावर जाऊन भात पिकांची सूक्ष्म पाहणी करून उपाययोजना सुचवल्या.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 24 ऑक्टोबरपर्यंत सरकारला अल्टिमेट दिला आहे. त्यापूर्वी 22 ऑक्टोबरला ते पुढील दिशा ठरवणार आहे. त्यापूर्वी जरांगे पाटील यांची पुणे जिल्ह्यातील पहिली सभा राजगुरूनगरमध्ये होणार आहे. गेल्या 16 दिवसांपासून राजगुरूनगर येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणास पाठबळ देण्यासाठी ते खेड मध्ये येणार आहे.