पुणे जिल्ह्यातील काही तालुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा वावर आहे. बिबट्या मानवी वस्तीत घुसून हल्ले करतात. त्यात अनेक वेळा पाळीव, प्राणी आणि मानवाचे मृत्यू झाले आहेत. गावांमध्ये बिबट्या दबक्या पावलांनी येतो आणि हल्ले करुन प्रसार होतो. आता बिबट्याच्या बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. पुणे जिल्ह्यात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) वापर करुन बिबट्याचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. वनविभागाच्या जुन्नर विभागातर्फे बिबट्या ओळखण्यासाठी किंवा त्याचे वास्तव्य आहे की नाही ते समजण्यासाठी एआयचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जुन्नर विभागाने एआयची प्रणाली तयार केली आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना बिबट्या त्या ठिकाणी असल्याचे कळणार आहे.
एआयद्वारे कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याची माहिती समजवण्यासाठी ही प्रणाली विकसित केली आहे. या एआय प्रणालीमुळे ५०० मीटरच्या परिसरातील बिबट्या किंवा इतर प्राण्यांचे छायाचित्र त्यात कैद होणार आहे. केवळ बिबट्या समोर आला तरच सायरन वाजणार आहे. इतर प्राणी आल्यावर सायरन वाजणार नाही.
कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्र क्लाऊडवर जाईल. त्या ठिकाणी प्राण्याच्या चित्रावर प्रक्रिया केली जाईल. बिबट्या असल्याचे स्पष्ट झाल्यास तो संदेश एआय प्रणालीकडे जाईल. त्यानंतर सायरन वाजणार आहे. सुनील चौरे यांनी ही प्रणाली तयार केली आहे. बिबट्यांच्या हालचालींचा डेटा एआय प्रणालीद्वारे संकलित होईल. बिबट्या दिसल्यास त्याची माहिती स्थानिक प्रशासनाला त्वरित दिली जाईल.
प्रणाली विकसित करण्यासाठी जंगल परिसरात उच्च गुणवत्तेचे कॅमेरे आणि सेन्सर्स बसवले जाणार आहेत. हे कॅमेरे बिबट्याच्या हालचाली टिपून तो डेटा एआयकडे पाठवणार आहे. एआय अल्गोरिदमचा वापर करुन बिबट्याची ओळख पटवली जाईल.
जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना पुन्हा घडली आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार हद्दीमध्ये बिबट्याचा महिलेवर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात सुजाता रवींद्र डेरे (वय वर्ष 40) असे या महिलेचे मृत्यू झाला. पिंपरी पेंढारमधील काही दिवसातील ही दुसरी घटना आहे.