मुंबई : ईशान्य भारतात आसाम आणि मिझोरम (Assam Mizoram border dispute) सीमेवरील हिंसाचारात 6 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. या धुमश्चक्रीत आसामच्या कचार (Cachar district) जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मराठमोळे अधिकारी वैभव निंबाळकर (IPS Vaibhav Nimbalkar) जखमी झाले आहेत. मिझोरममधील गटाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर यांच्या पायात गोळी लागली आहे. (Vaibhav Chandrakant Nimbalkar) मूळचे पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे असलेले वैभव निंबाळकर यांना आता आसामवरुन उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलं आहे.
IPS वैभव निंबाळकर यांना हवाई दलाच्या एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आलं. त्यांना आता कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. IPS वैभव निंबाळकर हे इंदापूर तालुक्यातील सणसर या गावचे आहेत. अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांचे ते भाऊ आहेत.
गेल्या काही दिवसापासून आसाम आणि मिझोराममध्ये वाद सुरु आहे. या वादाचं रुपांतर धुमश्चक्रीत झालं. दोन्ही बाजूने दगडफेक आणि गोळीबार झाल्याने, आसामचे तब्बल 6 पोलीस शहीद झाले तर अनेक जण जखमी आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील धडाकेबाज अधिकारी आणि सध्या आसाममध्ये कचार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहणारे वैभव निंबाळकर यांचा समावेश आहे.
वैभव हे मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर गावचे आहेत. 2009 च्या IPS बॅचचे अधिकारी असलेले वैभव निंबाळकर सध्या कचार जिल्ह्याचे एसपी आहेत. आसाममधील हिंसाचारामध्ये त्यांच्या पायाला गोळी लागली आहे.
वैभव यांचं प्राथमिक शिक्षण बारामतीत झालं. दहावीला ते पुण्यात आले. गावाकडून आलेला लाजराबुजरा पोरगा अशी वैभव यांची ओळख होती.
वैभव निंबाळकर हा मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यावेळी पंचक्रोशीत जल्लोष झाला होता. पदवीच्या पहिल्या वर्षापासून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. ते वर्ष होतं 2007. वैभव यांनी 2009 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना भारतीय पोलीस सेवेत अर्थात IPS प्रवेश मिळाला आणि आसाम हे केडर मिळालं. त्याआधी ऑगस्टमध्ये मसुरीला त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं.
आसाम हे नेहमीच धगधगत असणारं राज्य. त्यामुळे तणावग्रस्त या राज्यात ड्युटी करण्याऐवजी केडर बदलून घेण्याची इच्छा एखाद्याच्या मनात येऊ शकत होती. मात्र वैभव यांनी याच राज्यात काम करण्याचं ठरवलं होतं.
वैभव हे परीक्षा उत्तीर्ण झाले, त्यावेळी त्यांचे वडील न्यू इंडिया इन्शुरन्स या कंपनीत कामाला होते. तर आई गृहिणी आणि बहीण उर्मिला ही हिंदी-मराठी मालिकांमध्ये छोटे मोठे अभिनय करत होती.
वैभव निंबाळकर यांना लहानपणापासूनच वर्दीचे आकर्षण होते. त्यामुळे IPS झाल्याने त्यांना स्वत:चा आनंद गगनात मावेनासा झाला. वैभव यांना 12 वीला चांगले गुण मिळाले होते. त्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला होता. मात्र ते सोडून त्यांनी Bsc ला प्रवेश घेऊन यूपीएससीची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होऊन देशात 204 वा नंबर मिळाला. या परीक्षेसाठी वैभव यांनी सोशॉलॉजी आणि मराठी साहित्य हे विषय घेतले होते. मराठी साहित्य आणि निबंध या लेखी परीक्षांमध्ये ते रँक होल्डर ठरले होते.
वैभव यांना ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर 13 सप्टेंबर 2011 रोजी पहिलं पोस्टिंग आसाममधील बोकाखाट या जिल्ह्यात झालं. इथेच भारतातील प्रसिद्ध काझीरंगा अभयारण्याचा बराचसा भाग आहे. हा भाग तसा दुर्लक्षित मानला जातो. शेजारील राज्ये-देशांमधून मोठ्या प्रमाणात घुसरखोरी होते. नक्षलवादी, माओवाद्यांच्या हिंसक कारवाया होतात. अशा भागात वैभव यांनी डॅशिंग काम केलं. त्यावेळी आसाममध्ये गेंड्याची तस्करी होत होती. ती वैभव यांच्या पथकाने हाणून पाडली.
वैभव निंबाळकर यांच्या आरोग्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ट्वीट करीत प्रार्थाना केली आहे.
आसाममधखील बराक घाटी परिसरातील कचार, करीमगंज आणि हाईलकांडीची 164 किमीची सीमा मिझोरम राज्यातील आईजोल, कोलासीब आणि मामित जिल्ह्यांना लागते. जमीनीच्या कारणावरुन ऑगस्ट 2020 पासून आतंरराज्य सीमेवर संघर्ष सुरु झाला आहे. मिझोरमचे पोलीस महानिदेशक लालबियाकथांगा खिंगागते यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीमध्ये वादग्रस्त भागात एटलांन नदीच्या जवळील भागात रात्री आठ झोपड्या जाळण्यात आल्याचं सांगितलं. हिमंता बिस्वा सरमा आसामचे मुख्यमंत्री झाल्यानंतर संघर्ष वाढला आहे. गेल्यावर्षी झालेल्या संघर्षानंतर केंद्र सरकारनं हस्तक्षेप केला होता.
आसाम आणि मिझोरममधील आंतरराज्यीय सीमा वादावरुन दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आरोप प्रत्यारोप केले आहेत. वादग्रस्त भागात आसाम आणि मिझोरममधील पोलीस दल आणि सामान्य नागरिकांमध्ये संघर्ष झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. तिथे गोळीबार झाल्याचं समोर आलं होतं. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन आरोप प्रत्यारोप केले मात्र नंतर त्यांच्यात चर्चा झाल्याचं सागंण्यात आलं आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक देखील झाली होती.
मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामगांथा यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना त्याची आठवण करुन दिली. गृहमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर आसाम पोलिसांच्या दोन तुकड्या आणि नागरिकांनी मिझोरममध्ये वॅरेनग्टे ऑटो रिक्षा स्टँडवर लाठीचार्ज करुन अश्रूधुराच्या कांड्या फोडल्याचं सांगितलं. सीआरपीएफच्या जवानांनी मिझोरम पोलिसांवर आक्रमण केल्याचा दावा मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी केला
संबंधित बातम्या