पुणे : धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरच्या (Loudspeaker) वापरावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पाच मशिदींच्या अधिकाऱ्यांनी आणि येथील काही ज्येष्ठ मुस्लीम समुदायाच्या सदस्यांनी आगामी ईदच्या उत्सवादरम्यान डीजे (DJ) टाळण्याचा आणि त्यासाठी जमा झालेला निधी गरजू आणि गरिबांच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी समाजातील तरुणांना 2 मे रोजी ईद-उल-फित्र उत्सवादरम्यान मोठ्या आवाजात डीजे वाजवू नये, असे आवाहन केले आहे. अशा मोठ्या आवाजातील डीजेचे दुष्परिणाम सर्वांनाच ठाऊक आहेत. आजारी असणाऱ्यांसाठी तसेच हृदयाची समस्या असणाऱ्यांसाठी हे चांगले नाही, असे मत पुण्यातील (Pune) प्रमुख मशिदींच्या ज्येष्ठ सदस्यांचे आहे. म्हणूनच परिसरातील पाच मशिदींची एक कोअर कमिटी तयार केली आणि त्यांच्या इमाम आणि कार्यकर्त्यांची तसेच समाजातील इतर वरिष्ठ सदस्यांची बैठक घेतली आणि ईदच्या उत्सवादरम्यान डीजे न लावण्याचा निर्णय घेतला, असे लोहिया नगर भागातील मशिदीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
उत्सवादरम्यान डीजे सिस्टीम खरेदी करण्यासाठी जमा होणारा निधी परिसरातील गरजू आणि गरीब लोकांना मदत करण्यासाठी वापरला जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे. मशिदींवरील लाऊडस्पीकरच्या वापराबाबतही नियम आखण्यात आला आहे. परिसरातील पाचही मशिदी ध्वनी प्रदूषणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात आणि अझानच्या दरम्यान आवाज नेहमीच कमी ठेवला जातो, असेही मशिदीतर्फे सांगण्यात आले आहे.
या भागात संमिश्र लोकवस्ती आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत हिंदू समुदायातील कोणीही ‘अझान’ वाजविल्यामुळे कोणताही त्रास झाल्याची तक्रार केलेली नाही. येथील समुदाय सर्व सण एकोप्याने साजरे करतात, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. नमाजादरम्यान समाजातील लोकांना या निर्णयाची माहिती दिली जात आहे. या समुपदेशनाचा फायदा होत असून सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निर्णयाचे शहराच्या इतर भागातही अनुकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.