प्रदीप कापसे, पुणे | 23 जुलै 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट तयार केला. अजित पवार यांच्यासोबत जवळपास ४० आमदार आल्याचा दावा केला जात आहे. यामुळे शरद पवार गटाकडे राष्ट्रवादीतील १२ ते १५ आमदार असल्याचे म्हटले जात आहे. दोघांनी आपल्याकडे किती आमदार आहेत, त्याचा स्पष्ट आकडा अजून दिलेला नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील या घडामोडीमुळे राष्ट्रवादीकडे असलेले विरोधी पक्षनेतेपद आता काँग्रेसकडे येणार आहे. कारण विधानसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष आता काँग्रेसच आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेतेपदावर आपला दावा आधीच सांगितला. यामुळे पावसाळी अधिवेशन सुरु होताच काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होईल, अशी अपेक्षा होती. परंतु दोन आठवड्यातील पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा झाला आहे. काँग्रेसने अजूनही नाव निश्चित केलेले नाही. काँग्रेसकडे या पदासाठी अनेक पर्याय आहेत. परंतु दिल्लीतील आदेशाची प्रतिक्षा आहे.
काँग्रेस हायकमांडकडून सूचना आल्याशिवाय काँग्रेसचा विरोधी पक्षनेता निवडला जाणार नाही, असा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिल्लीतून येणाऱ्या आदेशाची प्रतिक्षा आहे. यापूर्वी काँग्रेसचा विधानसभा अध्यक्षपदावर दावा होता. परंतु नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने त्यासाठी नाव निश्चित केले नव्हते. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेना भाजपचे सरकार आले. त्या काळात महाविकास आघाडीचा अध्यक्ष असता तर निर्णय वेगळा असता. हा प्रकार पाहता विरोधी पक्षनेतेपदाची निवड लवकरात लवकर करावी, असा आग्रह राज्यातील काँग्रेस नेत्यांना आहे.
दिल्लीतून आदेश आल्याशिवाय नावाची घोषणा होणार नाही. यामुळे पावसाळी अधिवेशन सुरू होऊन आठवडा झाला तरी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता ठरत नाही. आता पुढील एकच आठवडा अधिवेशन असणार आहे. त्याकाळात तरी विरोधी पक्षनेतेपदाची निवड होणार का? हा प्रश्न काँग्रेसच्या आमदारांनाच पडला आहे.