पुणे : राज्यात अकरा महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले. त्यानंतर वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. दांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) गेल्यानंतर नागपूरमधील टाटा-एअरबस प्रकल्पही (Tata Airbus Project) निसटला होता. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यांत गुंतवणुकीवरुन राजकारण तापले होते. राज्यातून प्रकल्प जाण्यास सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत होता. आता मात्र रोजगाराची वाट पाहणाऱ्या सर्व बेरोजगार तरुणांना फडणवीस यांनी चांगली बातमी दिली आहे. पुण्यात पाच हजार कोटींचा गुंतवणूक प्रकल्प येत आहे. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.
कोणता प्रकल्प येणार
राज्यात पुणे फायनान्स हब होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, पुणे शहरात मोठे गुंतवणूक प्रकल्प येत आहेत. आता बजाज फिनसर्व कंपनी राज्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुणे येथे होणार आहे. यामुळे ४० हजार जणांना रोजगार मिळणार आहे. अलीकडच्या काळातील राज्यात झालेली ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
यापूर्वी हिंदुजासोबत करार
हिंदुजा ग्रुप मुंबई आणि महाराष्ट्रात एकूण 12 क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक तब्बल 35 हजार कोटी रुपयांची आहे. या गुंतवणुकीतून दीड लाख नागरिकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा सरकारने केला होता. या गुंतवणुकीच्या माध्यमातून प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, सायबर, मनोरंजन, नवीन टेक्नॉलॉजी, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्टरिंग अशा विविध विभागांचा समावेश होणार आहे. याबद्दलची माहिती हिंदुजा समूहाचे मुख्य जी पी हिंदुजा यांनी दिली होती.
रेल्वे सुरक्षा बल तसेच लोहमार्ग पोलिसांनी मुलांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघड केले होते. दोन दिवसांपूर्वी लहान मुलांना पुणे किंवा सांगलीतील मदरशात नेण्याचा प्लॅन होता. या 59 मुलांची पोलिसांनी सुटका केली त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार मुलांच्या तस्करी प्रकरणांबाबत सतर्क आहे. राज्यातील अशा प्रकारांना पायबंद घातला जाणार आहे.
लव्ह जिहदावर कायदा
आमचा आंतरधर्मीय विवाहांना विरोध नाही. परंतु फूस लावून विवाह करण्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. राज्यात लव्ह जिहादची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे राज्यात लव्ह जिहादसंदर्भात कायदा करण्याचा विचार सरकार करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.