Baramati loksabha election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झालीये. त्यामुळं नणंद विरुद्ध भावजय अशी थेट लढत बारामतीत होणार आहे. बारामतीतच्या अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा पवारांच्या
नावाची घोषणा झाली, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची उमेदवारी घोषित केली. त्यासोबत बारामतीत नणंद विरुद्ध भावजय अशी थेट लढत निश्चित झाली.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासूनच, सुनेत्रा पवार यांनी प्रचार सुरु केलाय. तेव्हापासून सुनेत्रा पवारच बारामतीतून दादांच्या उमेदवार असतील हेही स्पष्ट झालं होतं. अखेर अधिकृत घोषणा झाली आणि सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. सध्या प्रचारातही बदल आवश्यक आहे, असं सांगतानाच सुनेत्रा पवार मतदारांना आपल्या विजयी करण्याचं आवाहन करत आहेत.
महिन्याभरापासून अजित पवारही बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. विकासासाठी माझ्याच उमेदवाराला विजयी करा असं आवाहन करत आहेत. विशेष म्हणजेच, बारामतीत विजय शिवतारेंचं बंडही शांत करण्यात अजित पवारांना यश आलं आहे. शिंदे फडणवीस आणि अजित पवारांच्या बैठकीनंतर, शिवतारेंनी बारामतीतून माघार घेत असल्याची घोषणा केलीये.
विजय शिवतारे यांच्या आधी हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचंही समाधान झालं. त्यामुळं इंदापूरमधूनही सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. आता नणंद भावजयच्या लढाईत कोण जिंकत याचा फैसला 4 जूनलाच कळेल.
बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी अतिशय रंजक असणार आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या या मतदारसंघातून तीन वेळा खासदार आहेत. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा कौटुंबिक बालेकिल्ला मानला जातो.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी 5 टप्प्यात मतदान होणार आहे. बारामतीत मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. NCP (शरद पवार गट) महाराष्ट्रातील विरोधी आघाडी महाविकास आघाडीचा (MVA) भाग आहे, ज्यात शिवसेना (UBT) आणि काँग्रेस यांचाही समावेश आहे.