यंदा होणारी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राचं जनमत सांगणारी ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर आता पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे जनतेचा कौल कुणाला? हे सांगणारी ही निवडणूक आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवारांच्या बारामतीतही यंदा अटीतटीची लढत होणार आहे. अजित पवारांच्या विरोधात शरद पवार तगडा उमेदवार देणार आहेत. अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना शरद पवार उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे बारामतीत आता निवडणुकीच्या रिंगणातही काका विरूद्ध पुतण्या संघर्ष पाहायला मिळणार आहे.
युगेंद्र पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. युगेंद्र पवार यांना एबी फॉर्म दिल्याचीही माहिती आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासूनच ‘बारामती’ नक्की कुणाची? याची चर्चा होत आहे. अशातच आता विधानसभेची निवडणूक होत आहे. या मतदारसंघातून पवार घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाणार आहे. शरद पवार यांचे पुतणे आणि अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार विधानसभा लढणार आहेत. राज्याच्या राजकारणात काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यात संघर्ष सुरु आहे. अशातच आता बारामतीच्या निवडणुकीतही काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभेची निवडणूकही पवार विरूद्ध पवार अशी होणार आहे.
अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी देऊ केलेला नवा आणि तरूण चेहरा लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करू शकेन का? हे पाहणंही महत्वाचं असणार आहे. इथून मागे अजित पवार यांच्यासाठी बारामतीची लढाई ही त्या अर्थी सोपी होती. त्यांच्या विरोधात तितका तगडा उमेगदवार नव्हता. पण यंदा मात्र त्यांचे काका आणि राजकीय गुरूंनीच अजित पवारांना आव्हान दिलं आहे. त्यामुळे यंदा होणारी ही निवडणूक बारामतीकरांसाठी महत्वाची असणार आहे.