बारामती (पुणे) : पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लॉकडाऊन काळात वाहन चोरीच्या घटनांचं प्रमाणही वाढलं आहे. या घटनांची गंभीर दखल घेत बारामती तालुका पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या तपासात त्यांना योग्य यश मिळालं. त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून 5 दुचाकी, 5 मोबाईलसह 2 लाख 75 हजारांचा ऐवज जप्त केला (Baramati police arrest bike thief).
बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलिसांनी संबंधित घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक महेश ढवाण आणि त्यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली होती. त्यानुसार रोहन उर्फ कल्ल्या अविदास माने आणि ओंकार सुनील चंदनशीवे या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली. यावेळी त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून पाच दुचाकी, पाच मोबाईल आणि 25 हजार रुपये किंमतीच्या तांब्याच्या पट्ट्या असा ऐवज जप्त करण्यात आलाय.
उल्हासनगरात दुचारी चोरीची टोळी सीसीटीव्हीत कैद
लॉकडाऊन काळात राज्यातील अनेक भागांमध्ये दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्यात आहेत. वर्ध्यात काही दिवसांपूर्वी तर दुचाकीतील पेट्रोल चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहराच्या पंजाबी कॉलनी परिसरात 10 मेच्या पहाटे ही 8 जणांची टोळी गाड्या चोऱ्या करताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली होती. या टोळीतले काही जण आधी येऊन रेकी करतात आणि मग दोन जण येऊन गाड्या चोरून नेतात. ते समूहाने फिरत असल्यामुळे त्यांच्यावर सहज कोणी संशयही घेत नाही. याचाच फायदा घेत ही टोळी दुचाकी चोरी करून पसार होते. या दुचाकी चोरीच्या घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी या टोळीच्या विरोधात गुन्हा दाखल करत केला आहे
वर्ध्यात दुचाकींच्या पेट्रोलची चोरी
वर्ध्यातील सावंगी येथील शिवनेरी फोर्ट लेआऊट परिसरातील हॅपी टॉवरमध्ये रात्रीच्या सुमारास पार्किंगमधील दुचाकीमधून पेट्रोल चोरीची घटना समोर आली होती. या पेट्रोल चोरीची घटना सीसीटीव्ही कैद झाली होती. वर्ध्यातील रामनगर, बोरगाव यासह इतर परिसरात रात्रीच्या सुमारास वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या दुचाकीतून पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्या आहेत.