अभिजित पोते, बारामती, पुणे | 6 नोव्हेंबर 2023 : राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मतमोजणी सुरु झाली आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी दहा वाजता होणार आहे. पुण्यातील बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. बारामती तालुक्यातील उमेदवार मतमोजणी केंद्रावर आले आहेत. परंतु गुलाल उधळत ते मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत. आपल्या विजयाची खात्री असल्याचे सांगत ते आले आहेत. बारामती तालुक्यातील भोंडवे वाडी ग्रामपंचायतच्या सदस्यांना विजयाची खात्री असल्याचे सांगत गुलाल उधाळला आहे.
बारामती तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींपैकी 31 ग्राम पंचायतींचा आज निकाल येणार आहे. बारामती तालुक्यातील 1 ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. बारामती तालुक्यात एकूण 85% च्या वर मतदान झाले. अजित पवार यांच्या काटेवाडी गावातील ग्राम पंचायतीचा देखील आज निकाल येणार आहे. काटेवाडीत थेट राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली आहे. अजित पवार यांच्या पॅनलसमोर भाजपच पॅनल उभे राहिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर अजित पवार यांच्या गटाची सत्ता आहे. परंतु आता राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या भाजपने अजित पवार गटाला आव्हान दिले आहे. या निवडणुकीत पैसे वाटप झाल्याचा आरोप-प्रत्यारोप दोन्ही गटाकडून झाला होता. परंतु सत्तेची सूत्र कोणाकडे जाणार हे आज स्पष्ट होणार आहे.
बारामतीत मतमोजणी सुरू व्हायच्या आधीच उमेदवारांनी जल्लोष केला. आम्हाला विजयाचा विश्वास आहे. आम्ही गावात गुलाल खेळूनच मतमोजणीसाठी आलो आहोत, असे भोंडवे वाडी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सांगितले. मतमोजणी सुरू व्हायच्या आधीच अंगावरती गुलाल टाकत उमेदवार आल्याने मतमोजणी केंद्रावर चर्चेचा विषय ठरला. या ग्रामपंचायतीत अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात थेट लढत आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांना विजयाची खात्री नाही. त्यांच्यात धाकधूक आहे. एक, एक मत महत्वाचे असल्याचे अनेक उमेदवार म्हणतात. परंतु भोंडवे येथील उमेदवारांच्या विश्वास कमालीचा ठरला आहे.