वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण देशभरात पोहचले आहे. या प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) हादरले आहे. पंतप्रधान कार्यालयाने त्याची दखल घेतली आहे. आता पूजा खेडकर हिची नोकरीच धोक्यात आली आहे. यूपीएससीने तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिला आयएएस रद्द का करु नये? अशी नोटीस बजावली आहे. देशात खळबळ निर्माण करणारे हे प्रकरण आले तरी कसे? एका तरुणाने केलेल्या ट्विटमुळे हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या तरुणाचे नाव आहे वैभव कोकाट. सोशल मीडियाची ही ताकद लक्षात आल्यावर वैभव म्हणतो, एका ट्वीटमुळे एखाद्या आयएएस अधिकाऱ्याची नोकरीही जाऊ शकते, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते.
निवृत्त सनदी अधिकाऱ्याची मुलगी असलेल्या पूजा खेडकर कोण आहे? हे काही दिवसांपूर्वी कोणालाच माहीत नव्हते. त्यासंदर्भात वैभव कोकाट म्हणतो, “पूजा खेडकरसंदर्भात पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी एक अहवाल शासनाकडे पाठवला. तो मला मिळाला. तो वाचल्यावर एक प्रशिक्षणार्थी अधिकारी इतका माज कसा करु शकतो? असा प्रश्न मला पडला. त्यानंतर या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय मी घेतला.”
पूजा खेडकर हिचा शोध घेताना तिने बेकायदा अंबर दिवा ऑडी कारवर लावल्याचे लक्षात आले. त्याचे फोटो मला मिळाले. ते पोलिसांपुढे दिले असते तर प्रशासकीय दिरंगाई झाली असती, हे मला माहीत होते. त्यामुळे थेट सोशल मीडियाचा आधार घेतल्याचे वैभव कोकाट यांने म्हटले.
वैभव याने ६ जुलै रोजी पूजा खेडकर यांच्याबाबतची माहिती फोटोसह ‘एक्स’वर टाकली. त्यानंतर काही वेळेत ती प्रचंड व्हायरल झाली. प्रसारमाध्यमांनी त्या पोस्टची दखल घेतली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते यांचे वैभवला फोन आले. मग पूजा खेडकर संदर्भात अनेक माहिती आपल्याकडे येऊ लागल्याचे वैभवने सांगितले. या प्रकरणानंतर अनेक आयएएस अधिकाऱ्यांनी सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केले. सोशल मीडियावरील लेखन थांबवले.
एका ट्विट मध्ये मोठी ताकद असते, आपण निर्भिडपणे लिहिलं पाहिजे. काळ कठीण असला तरीही सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून खरं बोललं पाहिजे. व्यवस्थेविरोधात लिहा, बोला. व्यवस्था झुकवायची ताकद तुमच्या लिहिण्यात आहे…
— Vaibhav Kokat (@ivaibhavk) July 19, 2024
बीड जिल्ह्यातील वैभव कोकाट रहिवासी आहे. त्याला सामाजिक आणि राजकीय विषयांवर लिखाणाची आवड आहे. त्याने एका जनसंपर्क कंपनीत काम केले आहे. एक्सवर त्याचे ३१ हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. वैभव याने त्या प्रकारावर पुन्हा एका टि्वट केले आहे. त्यात तो म्हणतो, एका ट्विट मध्ये मोठी ताकद असते, आपण निर्भिडपणे लिहिले पाहिजे. काळ कठीण असला तरीही सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून खरे बोलले पाहिजे. व्यवस्थेविरोधात लिहा, बोला. व्यवस्था झुकवायची ताकद तुमच्या लिहिण्यात आहे…