योगेश बोरसे, पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या रिक्त जागेवर आता कधीही पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. या जागेवर इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीत यासाठी स्पर्धा लागली आहे. आता त्यात मनसेची भर पडली आहे. पुणे शहरात पुन्हा भावी खासदार म्हणून बॅनरबाजी सुरू झाली आहे. आता मनसे नेते वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा फलकांमध्ये वसंत मोरे यांचा उल्लेख भावी खासदार म्हणून केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून शहरात बॅनर झळकले होते. पुण्यातील वडगाव भागात हे बॅनर लावण्यात आले होते. तसेच भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचेही भावी खासदार म्हणून बॅनर लावण्यात आले होते. काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांची तयारी आहे. आता मनसेकडून वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून शहरात बॅनर्स लागले आहे.
भाजप शहराराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे लागले होते भावी खासदार म्हणून बॅनर्स काही महिन्यांपूर्वी लागले होते. आता पुण्यातील सिंहगड रोड परिसरात वसंत मोरे यांचे बॅनर्स लागले आहे. वसंत मोरे यांनीही खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे संकेत सोशल मीडियावर दिले होते. पुण्यात पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच भावी खासदारांची शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुळकर्णी, जगदीश मुळीक आणि माजी खासदार संजय काकडे या नावांवर सध्या भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. संजय काकडे, मेधा कुळकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांना राजकीय अनुभव मोठा आहे. तर स्वरदा बापट या नवख्या आहेत.
पुणे जिल्ह्यात भाजपने मिशन 2024 मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघाची जबाबदारी वाटण्यात आली आहे. पुण्यातील तीन लोकसभा मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पुन्हा राहुल कुल यांच्याकडे दिली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली आहे.