पुणे – राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलनच्या पाचव्या दिवशीही आपल्या मागण्या मान्य झाल्या शिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर कर्मचारी ठाम आहेत. या आंदोलनामध्ये आता एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उतरले आहेत. कुटुंबियांनी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात रस्त्यावर भीक मागो आंदोलन सुरु केले आहे.
थाळ्या वाजवून केला सरकारचा निषेध
लहान मुलांसह रस्त्यावर उतरत महिलांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे. तसेच थाळी वाजवत राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत हे भीक मागो आंदोलन केले जात आहे. जोपर्यंत राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरु ठेवणार, अशी भूमिका आंदोलनात सहभागी झालेल्या कुटुंबियांनी घेतली आहे.
जर राज्य सरकारमध्ये महामंडळाचे विलीनीकरण झाले तर त्यांच्या पगारात वाढ होईल. कुटुंबाचा आर्थिक दर्जा सुधारेल. या मागण्या मान्य झाल्या तर हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल. त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण घेता येईल अशी भावना आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना असणारे तुटपुंजे पगार, अपुऱ्या आरोग्याच्या सुविधा यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांना घरात सदस्य आजारी पडले योग्य उपचार देखील करता येत नाही. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची बिकट स्थिती लक्षात घ्यावी तसेच आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी महिलांनी केली आहे.
आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा डाव
दुसरीकडे परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या हमीमुळं शिवाजीनगर व स्वारगेट आगारात खासगी बस सेवा सुरु झाली आहे. खासगी बस सेवेमुळं आगारात अडकून पडलेल्या प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई, सांगली, औरंगाबाद या शहराकडे जाणाऱ्या बसेस स्वारगेट आगारातून रवाना झालया आहेत. मात्र आंदोलनामध्ये फूट पाडण्याच्या उद्देशानं सरकार हा कट करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
हेही वाचा:
परिवहन मंत्र्यांच्या हमीनंतर पुण्यातून खासगी बसेसची वाहतूक सुरू
कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रपतींकडे मागणी