पुणे: देशातील सर्व शासकीय प्रकल्प विकण्याचा घाट केंद्र सरकार कडून घातला जात आहे. त्यामुळे शासकीय नोकऱ्या कमी झाल्या आहे. उद्या आपल्याला 27 आरक्षण जरी मिळाले तरी शासकीय नोकरीच मिळणार नाही. त्यामुळे खासगीकरणाच्या विरोधात लढावे लागेल, असे आवाहन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले. तसेच आरक्षण वाचविण्यासाठी छत्तीसगढ राज्यात ओबीसींची जनगणना करण्यात येत असल्याचे बघेल यांनी सांगितले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. भिडेवाड्यात हा सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाज सुधारणेच्या कामाची सुरुवात या भावनातून झाली. समाजातील वंचित पिडीत शोषित घटकाला न्याय देण्यासाठी सर्व काही पणाला लावले. महिलांना समाजात सन्मान देण्याचे काम त्यांनी केले. वाड्यात या विहिरीत पाण्याने समाजातील वंचित घटकांची तहान भागविली त्यातून समाजक्रांती झाली. या समाज सुधारकांच्या या भूमीला वंदन करतो, असं बघेल म्हणाले.
महात्मा फुले यांनी वयाच्या 63 व्या वर्षापर्यंत समाज क्रांतीचा लढा दिला. त्यांनी लावलेली ज्योत आजही तेवत आहे. उत्कट क्रांतीकारी जीवन महात्मा फुले यांचे होते. कुठल्याही समस्येपासून त्यांनी माघार न घेता समाजातील वंचित, पीडित घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. अंधविश्वासावर प्रहार करून ती नष्ट करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. देशात साडेतीन हजार वर्षे पीडित समाजाने काम केलं. त्यामुळे जगाच्या आर्थिक उत्पन्नात भारताचा 23 टक्के वाटा होता. त्यामुळे भारताला सोने की चिडीया असे संबोधले जात होते. ब्रिटिश आल्यानंतर परिस्थिती बदलली. त्यावेळी समतेची ज्योत महात्मा फुले यांनी लावली. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढले. त्यांना न्याय मिळवून दिला. त्याच महात्मा फुले यांच्या विचारांवर छत्तीसगढ राज्य कार्य करत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून शिक्षणाच्या माध्यमातून सत्याचा आग्रह धरला त्यातून अंधश्रद्धा दूर करण्याचे प्रयत्न केले. महात्मा फुले यांचे विचार आणि पुढे महात्मा गांधी यांनी सत्याच्या प्रयोगातून पुढे नेले. महात्मा फुले यांचे विचार महात्मा गांधी यांनी पुढे नेले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हेच विचार संविधानाच्या माध्यमातून आपणास दिले. ते संविधान आज धोक्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा फुले समाजिक क्रांतीचे अग्रणी तर महात्मा गांधीजी राजकीय समाज सुधारणेचे अग्रणी होते. महात्मा फुले, महात्मा गांधी यांच्या काळात ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्या आज पुन्हा निर्माण झाल्या असून त्याविषयी आपल्याला लढावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना नमन केले होते. देशात जातीवादी धर्मवादी ताकद वाढत असून आपल्याला यापासून महात्मा फुले, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वाचवू शकतात. भारत सरकार देशातील प्रत्येक ओबीसी नागरिकाला केवळ 18 रुपये देते. त्यात चहा देखील विकत मिळत नाही, अशी टीका ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केली.
सद्याच्या सरकारमुळे देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. आरक्षण वाचवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ विशेष प्रयत्न करत आहेत. छत्तीसगढ राज्यात देखील ओबीसींच्या हक्कासाठी सर्व प्रथम मुख्यमंत्री बघेल यांच्या नेतृत्वात जनगणना करण्यात होत आहे. हे कार्य महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे असून त्या निमित्ताने आज समता परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात येत असल्याचे नरके यांनी सांगितले. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.नागेश गवळी यांनी तर आभार प्रदर्शन प्रित्येश गवळी यांनी केले.
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 9.30 AM | 28 November 2021 pic.twitter.com/2wnmwIuqlO
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 28, 2021
संबंधित बातम्या:
Pune | सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे विद्यापीठात भुजबळांच्या हस्ते भूमिपूजन
‘आमच्या कामावर अमित शाह समाधानी’, चंद्रकांत पाटलांकडून संघटनात्मक बदलांच्या चर्चेला पूर्णविराम