योगेश बोरसे, पुणे : राज्यातील राजकारणात रविवारपासून मोठ्या घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपासून अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. ते राज्याच्या सत्तेत शिवसेना-भाजपसोबत गेले. मग दुसरीकडे शरद पवार मैदानात उतरले. त्यांच्या गटाकडून बंडखोरांवर कारवाई सुरु झाली. स्वत: शरद पवार राज्याचा दौरा करणार आहे. दुसऱ्याबाजूला राज्यभरात कोणते पदाधिकारी कोणासोबत आहेत? हे दाखवण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. पुणे जिल्ह्यातून शरद पवार यांना धक्का देणारी बातमी आली आहे.
पुणे जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. अजित पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय गारटकर यांनी घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील 13 पैकी 10 तालुकाध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पुणे जिल्हाध्यक्षांसह दहाही तालुकाध्यक्ष अजित पवार यांच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी पोहचत आहेत.
पुणे जिल्ह्यातील मुळशी, पुरंदर आणि दौंडचे तालुकाध्यक्ष मात्र शरद पवार यांच्यासोबत जात आहे. परंतु इतर दहा तालुक्यांनी अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा धक्का मानला जात आहे.
मुंबईत अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाची बैठक बुधवारी होत आहे. या बैठकीसाठी पुणे शहरातून निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईत पोहोचायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांची बस देखील मुंबईत दाखल झाली आहे. शरद पवार यांच्या बैठकीला पुणे शहर कार्यकारणी हजेरी लावणार आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत एक मताने पुणे शहर कार्यकारिणीने आपला पाठिंबा शरद पवार यांना दर्शवला होता.