Police Bharti : रोहित पवारांच्या ‘त्या’ ट्विटनंतर पोलीस भरतीबाबत घेतला मोठा निर्णय

| Updated on: Jun 17, 2024 | 11:20 PM

राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू व्हायला काही दिवस बाकी आहेत. मात्र काही उमेदवारांचा मोठा गोंधळ उडाला होता. भरती प्रक्रियेमध्ये काही उमेदवारांनी अनेक पदांसाठी अर्ज केला होता. अशा उमेदवारांची मैदानी चाचणी लागोपाठ वेगवेगळ्या ठिकाणी येत असल्याने त्यांची मोठी गोची झाली होती. मात्र महाराष्ट्र विभागाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय.

Police Bharti : रोहित पवारांच्या त्या ट्विटनंतर पोलीस भरतीबाबत घेतला मोठा निर्णय
Follow us on

राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू होण्यासाठी अवघे तीन ते चार दिवस बाकी आहेत. मात्र भरती तोंडावर आली असताना पोलीस भरती देणारे उमेदवार गोंधळात पडले होते. कारण पोलीस भरतीमध्ये शिपाई पदासह इतर पदांसाठीही काही उमेदवारांनी अर्ज केलेला होता.  भरतीचं जे वेळापत्रक आलं त्यामध्ये मैदानी चाचणीच्या तारखा पाठोपोठ आल्याने उमेदवारांची गोची झाली होती. सोशल मीडियावर याबाबत अनेक पोस्ट  फिरू लागल्या होत्या. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही याबाबत राज्य सरकारवर टीका करत तारखा बदलण्याची मागणी केली. अखेर उमेदवारांच्या मागणीला यश आलं असून पोलीस विभागाने मोठा निर्णय घेतला आहे .

रोहित पवार यांनीही केली मागणी

महाराष्ट्र पोलीस भरती देणाऱ्या उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातू जाहीरपणे आपली समस्या मांडली.  याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत याबाबत राज्य सरकारला यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती. वर्षानुवर्षे भरतीची तयारी करायची पण ऐन भरतीच्या वेळेसच सरकारकडून अशाप्रकारचा सावळा गोंधळ निर्माण केल्याने विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागतोय. तरी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता पोलीस भरती व SRPF भरतीच्या तारखा बदलाव्यात असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस विभागाने याबाबत निर्णय घेतला.

 

महाराष्ट्र पोलीस विभागाने काय निर्णय घेतला?

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरणे साठी मैदाणी चाचणी मेदवारांनी विविध पदांकरिता (पोलीस शिपाई, चालक, बँडसमन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई) एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज केले आहेत. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी लागोपाठचे दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणी साठी हजर राहण्याची बाबतची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे उमेदवरांची गैरसोय होवू शकते. म्हणून सर्व घटक प्रमुखांना व Mahait विभागास सूचना देण्यात आली आहे की, ज्या उमेदवारास एकच वेळी दोन पदांकरिता मैदानी चाचणीस हजर राहणे साठी सूचना दिली असेल असा उमेदवार पाहिल्या ठिकाणी हजर राहिल्या नंतर त्या उमेदवारांना दुसरी ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी. दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी. तसेच मैदानी चाचणी ची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान 4 दिवसांचे अंतर असावं. मात्र संबंधित उमेदवार पहिल्या मैदानीला चाचणीला हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागणार असल्याचं महाराष्ट्र विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

 

दरम्यान, उमेदवारांची पोलीस भरती प्रक्रिया सुरू असेल तर अन् पावसाने हजेरी लावली तर  पुढची योग्य तारीख दिली जाणार आहे. आता मान्सून राज्यात दाखल झाल्याने पाऊस भरती प्रक्रियेमध्ये खोडा घालू शकतो. यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे.