भाजपचं ‘मिशन-144’, शिंदे गटाचं टेन्शन वाढणार की शिवसेना पुन्हा एकसंघ होणार?

| Updated on: Jan 02, 2023 | 7:34 PM

भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज चंद्रपुरात जाहीर सभा घेतली. या सभेदरम्यान जे पी नड्डा यांनी भाजपच्या 'मिशन-144'ची घोषणा केली.

भाजपचं मिशन-144, शिंदे गटाचं टेन्शन वाढणार की शिवसेना पुन्हा एकसंघ होणार?
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानांवरुन सुरु असलेला वाद वगळता महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपूरनंतर ते येत्या 10 जानेवारीला पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यातून जे पी नड्डा यांनी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिड्डू ठोकल्याचं स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता ‘मिशन-144’ सुरु केलंय. भाजपच्या या मिशनमुळे शिंदे गटाच्या देखील अडचणी वाढू शकतात. त्यामुळे आगामी काळात काय-काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज चंद्रपुरात जाहीर सभा घेतली. या सभेदरम्यान जे पी नड्डा यांनी भाजपच्या ‘मिशन-144’ची घोषणा केली. विशेष म्हणजे भाजपची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांच्या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपच्या या मिशनमुळे शिंदे गटाचं टेन्शन वढण्याची शक्यता आहे.

‘सगळ्याच जागा लढायच्या आहेत’, भाजपचा निर्धार

हे सुद्धा वाचा

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी ‘मिशन-144’ विषयी प्रतिक्रिया दिलीय. “राष्ट्रीय अध्यक्षांनी सगळ्यांना आदेश दिलाय की, देशातील सगळ्याच जागा आपल्याला लढायच्या आहेत त्याच भूमिकेत काम करा. तशातील ज्या चिन्हांकीत झालेल्या आहेत, 303 तर आम्ही जिंकलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त 144 जागा या अशा चिन्हांकीत झालेल्या आहेत की त्या जागांवर आपल्याला लक्ष केंद्रीत करण्यात आलं तर, 144 पैकी निम्म्या तरी जागा आपण काढू शकू. लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत 400 च्या पुढे जायचं आहे. त्यामुळे सगळ्याच जागा लढवायचं आहे, अशा भूमिकेत काम करण्याचे अध्यक्षांनी आदेश दिले आहेत”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

…म्हणून शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची भाषा बदलली?

राज्यात सत्तांतर होऊन आता सहा महिने होत आले आहेत. या दरम्यानच्या काळात शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला. नुकतंच विधी मंडळाचं नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाच्या काळात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी दीपक केसरकर यांना जाब विचारल्याची माहिती समोर आली होती.

दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीवर काल प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी एक सूचक विधान केलं. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केलं तर शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं.

शिंदे गटाचे अनेक आमदार अजून मंत्रिपदापासून वंचित आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप झालेला नाही. दुसरीकडे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक नेत्यांवर विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे भाजपची आगामी निवडणुकांसाठी सुरु असलेली तयारी. या सगळ्या घडामोडींकडे शिंदे गट कोणत्या दृष्टीकोनाने पाहतो आणि काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.