प्रदीप कापसे, पुणे : निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजप-शिवसेना युतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 22 जागांची मागणी केली आहे. त्यानंतर महायुतीमधील लहान पक्षांनीही वाढवून जागा मागितल्या आहेत. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 15 ते 16 जागांची मागणी केली आहे. तसेच अमरावती लोकसभा मतदार संघात प्रहारला उमेदवारी मिळावी यासाठी दावा ठोकणार असल्याच बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. आता महायुतीमधील आणखी एका पक्षाने दावा केलाय.
काय केला दावा
महाराष्ट्रात लोकसभेला महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्षाला 5 जागा हव्यात. टीव्ही 9 च्या माध्यमातून महादेव जानकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महादेव जानकर म्हणाले की, आम्हाला लोकसभेला 5 जागा मिळाल्या नाहीत तर महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहे.
शिंदे गटाची काय आहे तयारी
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत शिवसेना खासदारांची नुकतीच बैठक झाली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना जागावाटपाच्या सूत्रानुसार शिवसेना 48 पैकी 22 जागा लढवणार असल्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली होती. या बैठकीनंतर खासदार गजानन कीर्तिकर यांनी ही माहिती दिली.
बच्चू कडू काय म्हणाले होते
प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून 15 ते 16 जागांची मागणी केली आहे. तसेच अमरावती लोकसभा मतदार संघात प्रहारला उमेदवारी मिळावी यासाठी दावा ठोकणार असल्याच बच्चू कडू यांनी म्हटले आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून रवींद्र वैद्य हे खासदार नवनीत राणा विरोधात रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोणी कितीही दावा ठोको तो दावा खोडून काढण्याची ताकद आमदार रवी राणांमध्ये आहे. तसेच दिवसा स्वप्न पाहू नये रात्री स्वप्न पहावे… असा टोलाही आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांनी लगावला होता.