उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापूर दौऱ्यावर आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांची नाराजी दूर करण्यासाठी आज इंदापुरात भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाप्रमुख अंकिता पाटील यांनी भर मंचावर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. “मी भाजप युवा मोर्चाच्या वतीने इंदापूर तालुक्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करते. त्यांचं खरंच मनापासून आभारही मानते. कारण इंदापूर तालुक्याचा जो ज्वलंत प्रश्नावर आपण संघर्ष करत आहोत, त्या संघर्षाबाबतही चर्चा सुरु होती. आपला जो मागच्या 20 ते 25 वर्षांपासून संघर्ष सुरु होता त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला त्यांचा बहुमोल वेळ दिला. आमची तीनवेळा बैठक झाली. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सागर बंगल्यावर आमच्या 200 प्रमुख कार्यकर्त्यांना निमंत्रित केलं. त्यांच्याशीदेखील संवाद साधला. त्यासाठी मी आभार मानते”, असं अंकिता पाटील म्हणाल्या.
“इंदापुरात बुथ लेव्हलला पक्ष मजबुत झाला आहे. आपल्याला आम्ही मुंबईत भेटलो. आमच्या मनातील खदखद सांगितलं. आपण आमच्या कार्यकर्त्यांचं खूप संयमाने ऐकून घेतलं. साहेब, आम्हाला इथे खरंच खूप त्रास होतोय. इथे बसलेल्या आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे खोटे नाटे गुन्हे दाखल आहेत. ग्रामपंचायती बरखास्त झाल्या आहेत. आमच्या सरपंचांना त्रास दिला जातोय. त्यामुळे इतका त्रास इंदापूर तालुक्यात गेल्या सात ते आठ वर्षात झालाय जो कधीच झालेला नाही. इंदापूर तालुक्याची सुसंस्कृत अशी ओळख होती. पण आज इंदापूर तालुक्याचं नाव निघालं तर भ्रष्टाचारांच्या अवतीभोवती आणि हा ठेकेदारांचा तालुका अशी वाईट ओळख निर्माण झालीय. खरंच हे खूप दुर्देवी आहे”, अशी तक्रार अंकिता पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
“आम्ही एक महिन्यापूर्वी एक वक्तव्य केलं होतं. ते बोल आमचे होते पण भावना इथे उपस्थित सर्वांचे आहेत. गेल्या 30 वर्षांपासूनची खदखद होती. आम्ही आपल्याला ती खदखद सांगितली आहे. आपण आम्हाला सर्वांना आश्वासित केलं आहे. आपण जे बोलणार आहात ते ऐकण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत. आमचे सर्व कार्यकर्ते खूप स्वाभिमानी आहेत. आपण जो निर्णय द्याल ते मान्य करतील. फक्त एकच आहे, आमच्या तालुक्यावर मागच्या 4 वेळेस अन्याय झालेला आहे. तो पुन्हा होऊ नये, याची आपण जबाबदारी घेतलेलीच आहे. त्याबाबतीत आपण संबोधित कराल अशी आशा आहे”, असं अंकिता पाटील म्हणाल्या.
“भाजप युवा मोर्चाची जिल्हाप्रमुख म्हणून मी गेल्या 6 महिन्यांपासून कार्यरत आहे. आज 50 हजारापेक्षाही जास्त तरुणांना बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षात जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही मागच्या सहा महिन्यात मेरी माटी मेरा देश या उपक्रमातून हजार तरुणांना दिल्लीत घेऊन गेलो. आम्ही बारामती लोकसभेतील सहा विधानसभेच्या प्रत्येक गावातील तरुणांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांना घेऊन गेलो. आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघातील 18 ते 22 वयोगटातील 10 हजार युवकांना पक्षात जोडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्वांशी संपर्क साधला. आम्ही युवा संघटनेसाठी खूप चांगले कार्यक्रम राबवत आहोत”, अशी माहिती अंकिता पाटील यांनी दिली.
“इंदापुरात ही तिसरी पिढी आहे. भाजप कार्यकर्ते हे तीन पिढ्यांचे आहेत. ते 50 ते 60 वर्षांपासून पक्षाशी जोडले गेले आहेत. कार्यकर्ते गेल्या वर्षांपासून पूर्णपणे समर्पणाने काम करत आहेत. आपण 5 ते 8 हजार नागरिकांना आपल्या संस्थेतून काम करण्याची संधी दिली. आपल्या संस्थेच्या माध्यमातून 40 हजार कुटुंब चालवत आहोत. सर्व शिक्षण संस्थेत 30 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आपल्याकडे काम करणारे कर्मचारी हे सर्व धर्माचे आहेत”, असं अंकिता पाटील यांनी सांगितलं.