जयवंत शिरतर (जुन्नर) : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junnar) तालुक्यात बिबट्या सफारीवरून (Leopard safari) राजकारण (Politics) पेटले आहे. स्थानिक नागरिकही आता आक्रमक झाले आहेत. त्यातच शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस नंतर आता भाजपाही याच्यामध्ये आली आहे. भाजपाच्या नेत्या आशा बुचके (Asha Buchake) यांनी आक्रमक पवित्रा घेत जुन्नरची ओळख ही बिबट्या असून ही बिबट सफारी 2016मधेच जुन्नर तालुक्यातच होणार असे ठरले असतानाच कोणच्या तरी मर्जीने जणूकाही जिल्ह्याचा सातबारा कोणाच्या नावाने केला आहे की काय, अशा शब्दात बुचके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. गेली पन्नास वर्षे मानव आणि बिबट्याचा संघर्ष आम्ही सोसत आहोत. त्यामुळे वारसाने आलेली ओळख बिबट सफारी शिवजन्मभूमीतच झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, की बिबट सफारी बाहेर नेणाऱ्याने डोक्यातून हे वेड काढून टाकावे. बिबट्या हा जुन्नरचा वारसा आहे, अशा शब्दांत भाजपा नेत्या आशा बुचके यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. तर हा बिबट प्रकल्प येथून गेला तर तालुक्याची अस्मिता आणि उर्जा संपुष्टात येईल, असे शिवसेनेने म्हटले आहे.
ऐतिहासिकदृष्टया महत्त्वपूर्ण तालुका म्हणून जुन्नर (Junnar) ओळखला जातो. या तालुक्यात आता बिबट्यावरून (leopard) राजकारण पेटले असल्याचे चित्र दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये बिबट सफारीचा पायलट प्रोजेक्ट बारामतीला जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील विविध पक्ष तसेच स्थानिक नागरिकांनी या गोष्टीला आक्षेप घेतला आहे.