पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षणाबाबत खरे बोलल्याने चव्हाणांना राग आला आहे. त्यांना राग येतो म्हणून आम्ही मराठा आरक्षणाच्या विषयात गप्प बसणार नाही. तसेच कोरोनाचे कारण दाखवून मराठा समाजातील तरूण तरुणींना संताप व्यक्त करण्यापासून रोखताही येणार नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. (BJP leader Chandrakant Patil slams ashok chavan over maratha reservation issue)
चंद्रकांत पाटील यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली. या सरकारला मराठा आरक्षण द्यायचे नव्हते, हे सामान्यांच्या मनात बिंबलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालात एक परिच्छेद आहे की, राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या मराठी मजकुराचा इंग्रजी अनुवाद मिळाला नाही. निर्णयाच्या एक परिच्छेदात असेही म्हटले आहे की, मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार नव्हते परंतु स्थगिती न देता खटला चालवू म्हटल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून प्रत्येक वेळा तारीख मागितली गेली. अखेर नाईलाजाने न्यायालयाला स्थगिती द्यावी लागली. सामान्यतः कायद्याला स्थगिती मिळत नाही. पण राज्य सरकारकडून चालढकल चालू आहे, हे कोर्टाच्याही ध्यानात आले. मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकारने दुर्लक्ष केले. त्यांना हे आरक्षण द्यायचे नव्हते. तर त्याबद्दल बोलायचे नाही का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.
मराठा समाजाच्या तरुण-तरुणींच्या मनात अनिश्चिततेमुळे निर्माण झालेला संताप व्यक्त करण्यापासून कोरोनाचे संकट असले तरी रोखता येणार नाही. कोरोनाचे नियम पाळून आणि संसर्ग होणार नाही याची काळजी घेऊन त्यांना आंदोलन करू द्यावे लागेल. एकीकडे सत्ताधारी आमदारांना गावांमध्ये रस्ते करण्यासाठी निधी देता, तुमचे सर्व राजकारण चालू ठेवता आणि दुसरीकडे मराठा तरुण-तरुणींना रस्त्यावर उतरू नका म्हणता. पण ते ऐकणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
मराठा समाजाला 3 हजार कोटींचे पॅकेज द्या, अशी मागणी मी कालच केली आहे. असे पॅकेज देण्याबाबत न्यायालयाने सरकारला अडवलेले नाही. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे समाजाचे होणारे नुकसान भरून देऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. मग आता ते भरून द्या, असेच आमचे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस सरकार असताना मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी वैधानिक प्रक्रिया पूर्ण करताना कायदा होईपर्यंत आम्ही मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगारासाठी सवलती दिल्या होत्या. तशा सवलती द्या, अशी मागणीही त्यांनी केली.
सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून भांडणे व नाराजी चालू आहे. आपसातील भांडणे कधी तरी चव्हाट्यावर येणारच. सध्या जलसंपदा विभागाशी संबंधित काही विषय समोर आले आहेत. अशा अनेक घटना आहेत. आगामी काही दिवसात त्या दिसतील, असंही ते म्हणाले. (BJP leader Chandrakant Patil slams ashok chavan over maratha reservation issue)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 15 May 2021 https://t.co/UNgYphF9pi #News
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 15, 2021
संबंधित बातम्या:
Audio Clip: आमदार देवेंद्र भुयार यांची महिलेसोबतच्या संभाषणाची आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल
देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस देवेंद्र फडणवीसांनी करावे : नाना पटोले
कोरोनाच्या काळात कामासाठी फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल: चंद्रकांत पाटील
(BJP leader Chandrkant Patil slams ashok chavan over maratha reservation issue)