उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांची भेट घेतली आहे. प्रविण माने हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख आहेत. त्यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस आज इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. इंदापुरात आज भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण यामुळे इंदापुरात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या सर्व कार्यकर्त्यांची आज कार्यकर्ता मेळाव्यातून नाराजी दूर केली जाणार आहे.
भाजपच्या मेळाव्यासाठी इंदापुरात दाखल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने प्रविण माने यांची भेट घेतली आहे. फडणवीस यांनी प्रविण माने यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीमुळे प्रविण माने अजित पवार गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे ते गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापताना दिसत आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आज कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस या कार्यकर्ता मेळाव्यातून भाजप कार्यकर्त्यांची नाराजू दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची प्रविण माने यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “प्रविण माने दादांशी माझे खूप जुने संबंध आहेत. वैयक्तिक संबंध आहेत. ते अनेकवेळा माझ्या घरी येतात. ते बऱ्याच दिवसांपासून माझ्या मागे लागले होते की, इंदापुरात तुम्ही येता पण माझ्याकडे येत नाहीत. त्यामुळे मी कबूल केलं होती की, मी तुमच्याकडे चहा प्यायला येईल. त्यामुळे मी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो होतो. ते आमच्यासोबतच आहेत. आमचे जुने सहकारी आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.