पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईडीकडून मुंबईत सुरु असलेल्या कारवाईवरुन सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला भारतातील वादग्रस्त धर्मगुरु आणि देशद्रोहाचा आरोप असलेला झाकीर नाईकने साडेचार कोटी रुपये दिले, असा मोठा दावा केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. संजय राऊत यांच्या या दाव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. झाकीर नाईकने संस्थेला अडीच कोटी रुपये दिले होते, अशी कबुली विखे पाटलांनी दिली. पण झाकीर नाईकने 10 ते 15 वर्षांपूर्वी पैसे दिले होते. तसेच त्याची चौकशीदेखील झाली होती, असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
“संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, असं मी अनेकदा सांगितलंय. तुम्ही सुद्धा पत्रकार बांधवांनी त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. झाकीर नाईकचा जो मुद्दा आहे, झाकीर नाईकने 10 ते 15 वर्षांपूर्वी प्रवरा मेडिकल ट्रस्टला अडीच ते तीन कोटी रुपये दिले होते. त्याने ती देणगी दिली होती. ही देणगी 400 कोटी नव्हती. त्यानंतर या प्रकरणी चौकशी झाली होती. भारत सरकारने चौकशीदेखील केली होती. भारत सरकारने याप्रकरणी चौकशी पूर्ण करुन 10 वर्षापूर्वीच केस बंद केली”, असं स्पष्टीकरण राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं. विखे पाटील यांच्या या स्पष्टीकरणानंतर आता संजय राऊत नेमकी काय भूमिका मांडतात ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
“राधाकृष्ण विखे पाटील यांचा गणेश साखर कारखान्यात पराभव का झाला? कारण भ्रष्टाचार. तुमच्या भाजपच्याच लोकांनी तो पराभव केलाय. राधाकृष्ण विखे पाटलांच्या संस्थानात झाकीर नाईक साडेचार कोटी रुपये का देतो? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ईडीची चौकशी करण्याची हिंमत आहे का?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
“गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईडीला पत्र लिहावं. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्यात झाकीर नाईक ज्याच्यावर टेरर फंडिंगचा आरोप आपल्याच केंद्र सरकारचा आहे, साडेचार कोटी रुपये का मिळाले, कसे आले, त्या पैशांचा कसा व्यवहार होता, काय हालचाली होत्या? फडणवीस यांच्याकडे माहिती नसेल तर आम्ही द्यायला तयार आहोत. ते तुमच्या बाजूला मांडी लावून बसतात”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.