पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पक्षात यासंदर्भात आत्मचिंतन सुरु झाले आहे. कारण भाजपचा हा ३२ वर्षांपासूनचा अभेद्द गढ होता. तो उद्धवस्थ झाल्यामुळे राष्ट्रीय पातळीवरही त्याची दखल घेतली गेली आहे. आता हा पराभव का झाला ? यासंदर्भात महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष संजय काकडे यांनी कारणे दिली आहे. त्यापूर्वी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना या पराभवाची जबाबदारी त्यांचीसुद्धा असल्याचा मेसेज पाठवला होता.
पराभवावर बोलताना संजय काकडे म्हणाले की, हा काँग्रेसचा विजय नाही. हा विजय रवींद्र धंगेकर यांचा आहे. मागील मनपा निवडणुकीत रवींद्र धंगेकर अपक्ष असताना निवडून आले होते. त्यावेळी मनपाच्या वार्डात त्यांना १८ हजार मते मिळाली होती.
लढत काँग्रेस-भाजप झालीच नाही
कसबा पेठेची लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये झालीच नाही. ही लढत धंगेकर आणि रासने यांच्यात झाली. धंगेकर यांच्या विजयासाठी एनसीपी, काँग्रेस व ठाकरे गट होता. त्यांचे मोठमोठे नेते प्रचारात होते. आम्ही फक्त राज्य पातळीवरील नेत्यांना प्रचारात आणले. परंतु जो पराभव झाला आम्हाला मान्य आहे.
उमेदवार कमकुवत ठरला
कसबा पेठेत उमेदवार निवडताना आमची चूक झाल्याचे काकडे यांनी मान्य केले. आमचे उमेदवार हेमंत रासने यांनीही हे मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. पुढील विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना टक्कर देणारा उमेदवार देऊ. अन् पुन्हा हा गड भाजपकडे येईल, असे त्यांनी सांगितले.
धंगेकर लोकप्रिय होते
उमेदवार निवडीत चूक झाल्याची मान्य करताना रवींद्र धंगेकर यांचे काकडे यांनी कौतूक केले. ते म्हणाले, धंगेकर लोकप्रिय उमेदवार होते. सर्व्हेमध्ये हे सिद्ध झाले होते. आमचा सर्व्हे चुकीचा सिद्ध झाला. या सर्व्हेमुळे हेमंत रासने यांचे नाव दिल्लीतून आले आहे. कसबामधील विजय भाजप आणि काँग्रेसचा नाही, हा धंगेकर यांचा विजय आहे.
चंद्रकांत पाटील यांना सोशल मीडियावर घेरलेे
एका सभेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, मी गेल्या दहा बारा दिवसांपासून ऐकतोय. धंगेकर विरुद्ध रासने. अरे हु इज धंगेकर?, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. एका विराट सभेला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं होतं. त्यालाच आता काँग्रेसने बॅनर्स लावून उत्तर दिलं आहे.