पुणे | 21 सप्टेंबर 2023 : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली. पडळकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पत्र लिहिलं होतं. पण सत्तेत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे देखील आहेत. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांना का पत्र पाठवलं नाही? असा प्रश्न पडळकर यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी टीका केली.
“अजित पवार हे लबाड लांडग्याचं पिल्लू आणि सुप्रिया सुळे या लबाड लांडग्याची लेक आहेत”, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यांच्या याच टीकेवरुन मोठा वाद निर्माण झालाय. पडळकरांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात संतापाची लाट पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं.
अखेर या प्रकरणाचा विस्तार वाढत असल्याचं समजल्यानंतर भाजपने अजित पवार यांची जाहीरपणे माफी मागितली आहे. याबाबत स्वत: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना जाहीर माफी मागितली आहे. तसेच आपण या विषयी गोपीचंद पडळकर यांच्याशी बातचित करु, अशीही प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिलीय.
“पडळक ज्या पद्धतीने अजित पवार यांच्यावर बोलले, हे संस्कार आणि संस्कृतीला सोडून आहे. त्यांच्या वक्तव्याचं भारतीय जनता पक्ष कधीही समर्थन करणार नाही. शेवटी महाराष्ट्र संस्कार, संस्कृतीचं राज्य आहे. अजित दादा यांच्याबद्दल जे काही बोललं गेलं त्याबद्दल मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
“पक्षीय राजकारणाची टीका होऊ शकते. व्यक्तीगत टीका होऊ शकत नाही. पडळकर जे काही बोलले आहेत त्याबद्दल मी अजित पवारांना सांगेन, त्यांनी मोठ्या मनाने माफ करावं. शेवटी एक जबाबदार विधान परिषदेच्या सदस्याने या पद्धतीने बोलू नये. भाजपचे ते जबाबदार नेते आहे. त्यामुळे त्यांना मी बोलणार आहे. अजित पवार यांचं जे मन दुखावलं आहे त्याबद्दल मी क्षमा मागतो’, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनावर गोपीचंड पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली. “माझ्या विरोधातील आंदोलनाकडे मी लक्ष देत नाही”, असं पडळकर म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी भाजपच्या माफीवर बोलण्यास टाळलं आहे.