अभिजित पोते, पुणे : राज्यात लवकरच निवडणुकींचा माहोल सुरु होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात यासंदर्भात संकेत दिले. महापालिका, विधनासभा, लोकसभा निवडणुकीचे हे वर्ष आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका लागण्याचे संकेत दिले. त्याचवेळी पुण्यात भाजप राज्यभरातील निवडणुकीची रणनीती ठरवणार आहे. राज्याच्या कार्यकारणीच्या बैठकीत ही रणनीती ठरणार आहे.
कधी होणार चर्चा
पुणे शहर भाजप राज्य कार्यकारणीची बैठक १८ मे रोजी होणार आहे. या बैठकीत भाजप राज्यभरातील निवडणुकीची रणनीती आखणार आहे. राज्य कार्यकारणीच्या बैठकीच्या निमित्ताने भाजप इलेक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या दोन नेत्यांनी सोमवारी निवडणुकीचे संकेत दिल्यानंतर भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे. यासंदर्भात १८ तारखेला भाजप प्रदेश कार्यकारणी बैठक पुणे शहरातील बालगंधर्वला होणार आहे. त्यात ही रणनीती ठरवण्यात येणार आहे.
राष्ट्रीय अध्यक्षांची उपस्थिती
पुणे शहरात होणाऱ्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित राहणार आहे. यावेळी राज्यातील आमदार आणि खासदारांच्या गटाची ते बैठक घेणार आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक तसेच येणाऱ्या विधानसभा अन् लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने यामध्ये चर्चा होणार आहे. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मंत्री गटाची देखील बैठक घेणार आहे.
कर्नाटकावर होणार चर्चा
कर्नाटक निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत चर्चा करण्यात येणार आहे. सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करताना त्यांनी सांगितले की, कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये आम्ही हरलो असलो तरी मतांमध्ये फार मोठ्या फरकाने काही फरक पडला नाही. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला तरी जनमतांचा आदर करत आम्ही पराभव मान्य केला आहे. प्रत्येक वेळी निवडणूक जिंकता येत नाही, कधी जिंकावं लागतं तर कधी कधी हरावंही लागतं, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कर्नाटकच्या निवडणुकीत कुठे आपली मतं कमी झाली नाहीत पण मी आज दाव्याने सांगतो आहे की, प्रत्येकाने हे लिहून घ्यावं की उद्या कर्नाटकमध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक पुन्हा येईल तेव्हा 28 पैकी 25 जागा भाजप जिंकणार असल्याचा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.