मावळ, पुणे : मावळमधील तळेगाव दाभाडे येथे अजित पवार (Ajit Pawar) यांनी भूमिपूजन केलेल्या जागेवर भाजपाने गोमूत्र टाकून जागा स्वच्छ केली आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन केले होते. तर त्याचठिकाणी येऊन भाजपाने (BJP) त्याजागी गोमूत्र आणि पंचामृत टाकत ती जागा स्वच्छ केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपवित्र हाताने केलेल्या भूमिपूजनाचे स्थळावर जाऊन आम्ही निषेध नोंदवत आहोत, असे भाजपाने म्हटले आहे. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी गोमूत्र आणि पंचामृत टाकत ही जागा पवित्र करत असल्याचे म्हटले आहे. मावळ गोळीबार (Maval firing) जनता विसरली नाही. ही भूमी अपवित्र झाली आहे. ती आम्ही पवित्र करत आहोत, असे भाजपाने म्हटले आहे.
काल तळेगाव दाभाडे नगर परिषद इमारतीचे उद्घाटन केले. 9ऑगस्ट 2011ला मावळवासीयांनी पवना बंद जलवाहिनीविरोधात आंदोलन केले होते. तळेगावात देखील हे आंदोलन झाले होते. त्या आंदोलनात पोलिसांना बेछूट गोळीबाराचे आदेश कोणी दिले, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे त्याच माणसाच्या हस्ते होणार असेल, आणि शासकीय कार्यक्रमात राजकीय कार्यक्रम करणार असाल तर याचा निषेध आम्ही करतो, असे भाजपाने म्हटले आहे.
अपवित्र हाताने भूमिपूजन झाल्याने ही भूमी अपवित्र झाली आहे. ती पवित्र करण्याचे काम भाजपाच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी गोमूत्र शिंपडून आणि पंचामृत टाकून स्वच्छ करत केले आहे, असे भाजपा कार्यकर्ते यावेळी म्हणाले. ज्या मावळातील जनतेवर अजित पवारांनी 2011साली पाणी प्रश्नावर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते, त्याच मावळात अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा करण्यात आला, असा आरोप भाजपाने केला आहे. दरम्यान, बंद पाइपलाइनच्या प्रश्नी आंदोलन आणि नंतर गोळीबार यामुळे सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके याठिकाणी मोठ्या फरकाने निवडूनही आले. त्यामुळे विरोधकांना मतदारांनी योग्य उत्तर दिल्याचे राष्ट्रवादीने आधीच सांगितले आहे. मात्र भाजपा यावरून राष्ट्रवादीला लक्ष्य करण्याची संधी सोडत नसल्याचे दिसत आहे.