मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण… पुण्यात दोन संघटना भिडल्या; पुणे विद्यापीठात राडा

| Updated on: Nov 03, 2023 | 3:06 PM

पुणे विद्यापीठात भाजप युवा मोर्चा आणि एसएफआय या दोन संघटना भिडल्या आहेत. या दोन्ही संघटनांमध्ये तुफान राडा झाला आहे. पुणे विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं होतं. भाजप युवा मोर्चाने आंदोलन केलं. त्यावेळी एसएफआयच्या कार्यकर्त्यांशी त्यांची शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे दोन्ही संघटना भिडल्याने विद्यापीठ परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.

मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण... पुण्यात दोन संघटना भिडल्या; पुणे विद्यापीठात राडा
bjp yuva morcha
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे | 3 नोव्हेंबर 2023 : पुणे विद्यापीठातील हॉस्टेलच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं होतं. या घटनेचे जोरदार पडसाद उमटले आहेत. या घटनेचा भाजप युवा मोर्चाने जोरदार निषेध नोंदवला आहे. भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे विद्यापीठ परिसरात जोरदार निदर्शने केली. यावेळी एसएफआयचे कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. दोन्ही संधटनांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने विद्यापीठ परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, दोन विद्यार्थी संघटना आमनेसामने आल्याने या परिसरात वातावरण निर्माण झाला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आठ नंबर होस्टेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पद्धतीची पेंटिंग काढण्यात आली होती. यावेळी आक्षेपार्ह मजकूरही लिहिण्यात आला होता. या घटनेचा अभाविपने निषेध नोंदवला होता. तसेच विद्यापीठाने तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार देऊन संबंधितांना अटक करून गुन्हे दाखल करावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराच अभाविपने दिला होता. मात्र, विद्यापीठाकडून कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने अखेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार निदर्शने केली.

पूर्व कल्पना देऊन आंदोलन

भाजप युवा मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते विद्यापीठ परिसरात आले होते. या आंदोलकांनी आंदोलन करण्याची पूर्व कल्पना दिली होती. त्यामुळे पुणे विद्यापीठात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मोदींबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्याला अटक करण्याची मागणी लावून धरण्यात आली. विद्यार्थी आणि विद्यार्थीनी या निदर्शनात मोठ्या प्रमाणावर सहभागी होते. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने या परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची एसएफआय या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे दोन्ही संघटनांमध्ये प्रचंड राडा झाल्याने वातावरण अधिकच तापलं होतं.

दोन्ही संघटना भिडल्या

दोन्ही संघटना एकमेकांना भिडल्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या आंदोलकांची धरपकड सुरू केली. एक एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसेच इतर आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. तब्बल तासभर विद्यापीठ परिसरात हा राडा सुरू होता. मात्र, सर्वांना शांत करण्यात पोलिसांना अखेर यश मिळालं. त्यामुळे या परिसरातील तणाव निवळला आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून विद्यापीठ परिसरात अजूनही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.