रणजित जाधव, पुणे | 27 जुलै 2023 : लोणावळा परिसरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे २३ जुलै रोजी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली होती. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर पुणे आणि मुंबईकडील वाहतुकीतवर परिणाम झाला होता. ही वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दरड हटवण्याच्या कामासाठी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक घेऊन महामार्ग सुरळीत करण्यात आला होता. आता पुन्हा हा महामार्ग बंद करुन कमकुवत दरडी काढण्याचे काम करण्यात आले.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर गुरुवारी पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत हा ब्लॉक घेण्यात आला. लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी सैल झाल्या आहेत. या सैल झालेल्या दरडी हटवल्या गेल्या. दोन तासांत हे काम पूर्ण करण्यात आले.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक असणार असल्यामुळे हलकी वाहतूक मॅजिक पॉईंटपासून जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळवली गेली. परंतु जड वाहतुकीला या मार्गावर बंदी होती. यामुळे जड वाहतूक जिथे आहे तिथेच थांबवली गेली. मुंबईवरुन पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरूच राहणार आहे.
दुपारी 12 ते 2 या वेळेत हा ब्लॉक घेतल्यामुळे सर्व वाहतूक जुन्या मार्गावर सुरु झाली होती. यामुळे या मार्गावर वाहनांची आवक-जावक वाढली. दोन्ही मार्गावरील वाहतूक एकाच ठिकाणी आल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. ही परिस्थिती लक्षात घेऊन जुन्या एक्स्प्रेस वे वर महामार्ग पोलिसांची नियुक्ती केली गेली होती.
लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे भुशी धरण ओसंडून वाहत आहे. लोणावळ्यात पर्यटकांची चांगलीच गर्दी होऊ लागली आहे. वीकेंडमुळे शनिवार अन् रविवारी लोणावळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत.