पुणे : पुणे-मुंबई लोहमार्गावर (Pune Mumbai railway line) दरड कोसळली आहे. मंकीहील ते ठाकूरवाडी दरम्यान ही घटना मध्यरात्री घडलेली असून, अद्याप दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अप लाइनवर ही दरड कोसळल्याने (Boulders fall) मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद आहे. अप लाइनवरील वाहतूक मिडल लाइनकडे वळविण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र अप लाइन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. या दरड कोसळण्याच्या घटनेमुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक प्रभावित झालेली आहे. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून विषयीची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, आज 12 ऑगस्ट रोजी लोणावळ्याजवळ (Lonavala) पुणे-मुंबई लोहमार्गावर ही दरड कोसळली. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
घटना घडल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. बोल्डर आणि ओएचईचा खांब पडल्याने हा मार्ग ठप्प झाला आहे. दरड हटवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. विकेंड असल्याने साधारणपणे शुक्रवार ते रविवारच्या दरम्यान अनेक जण मुंबई-पुणे रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र, मध्यरात्री या घाट परिसरात दरड कोसळळ्याने रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. तर दरड बाजूला करण्याचे काम सुरू असून याला वेळ लागण्याची शक्यता रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. घटनास्थळी बंदोबस्तासाठी आरपीएफचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र मागील तीन दिवसांपासून लोणावळा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. लोणावळ्यात आत्तापर्यंत 3408 मिमीपेक्षा अधिक पाऊस बरसला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. अद्यापही पाऊस सुरू असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.