Pune crime : कारवाई टाळायची असेल तर दोन कोटी द्या म्हणणाऱ्यावरच कारवाई, लाचखोर आरटीआय कार्यकर्त्याला पुण्यात रंगेहात अटक

| Updated on: Jul 20, 2022 | 8:17 PM

खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याकडे संबंधित ठेकेदाराने तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-सातारा रस्त्यावर सापळा लावला. यावेळी ठेकेदाराकडून 25 लाखांची खंडणी घेताना फाळके याला पकडण्यात आले.

Pune crime : कारवाई टाळायची असेल तर दोन कोटी द्या म्हणणाऱ्यावरच कारवाई, लाचखोर आरटीआय कार्यकर्त्याला पुण्यात रंगेहात अटक
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : 25 लाख रुपयाची खंडणी स्वीकारताना आरटीआय कार्यकर्त्याला (RTI Activist) अटक करण्यात आली आहे. एका बांधकाम ठेकेदाराकडे या आरटीआय कार्यकर्त्याने तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी (Extortion) मागितली होती. त्यातील 25 लाख स्वीकारताना खंडणीविरोधी पथकाने त्याला अटक केली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी परवानगी घेतली का, अशी विचारणा करत कोर्टात कारवाई होऊ द्यायची नसेल तर दोन कोटी रुपये द्या, अशी धमकी त्याने दिली होती. दत्तात्रय फाळके (वय 46, रा. मानसिंग रेसिडेन्सी, तळजाई पठार, धनकवडी) असे या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे. प्रकरणी भरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) काल गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेली आहे. तक्रारदारांच्यावतीने या गुन्ह्यात अॅड. हेमंत झंजाड काम पाहत आहेत.

वारंवार करत होता विचारणा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची जामखेड तालुका, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे उत्खणाचे काम सुरू आहे. याबद्दल सगळ्या परवानग्या घेतल्या आहेत का, असे फाळके वारंवार विचारणा करत होता आणि दंडात्मक कारवाई नको असेल तर दोन कोटी रुपये द्या, अशी मागणी करत होता. संबंधित ठेकेदाराने याबाबत खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. राष्ट्रीय महामार्गाचे काम तक्रारदार करत आहेत. नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात तक्रारदाराच्या कंपनीकडून सध्या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. दरम्यान, आरोपी फाळके ठेकेदारास भेटला. तुमच्या कंपनीकडून बेकायदा उत्खनन करण्यात आलेले आहे. या कामाची रीतसर परवानगी घेण्यात आलेली नाही, उत्खननाचे शुल्क भरलेले नाही. त्यामुळे दंडात्मक कारवाई होऊ शकते. ती टाळायची असेल तर दोन कोटी रुपये द्यावे लागतील, अशी धमकी त्याने दिली होती.

हे सुद्धा वाचा

पुणे-सातारा रस्त्यावर सापळा

खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याकडे संबंधित ठेकेदाराने तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-सातारा रस्त्यावर सापळा लावला. यावेळी ठेकेदाराकडून 25 लाखांची खंडणी घेताना फाळके याला पकडण्यात आले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने 25 जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपासही सुरू आहे.