बैलगाडी शर्यतीचा IPL प्रमाणे थरार, ‘हरण्या’ बैलाने कशी जिंकली शर्यत, पाहा Video

| Updated on: Mar 31, 2023 | 11:27 AM

सांगलीवाडी येथील हिंदवी जनसेवा फाउंडेशनतर्फे बैलगाडी शर्यत आयोजित केली गेली होती. या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर परिसरातील जनता आली होती. शर्यतीत 'हरण्या' बैलाने बाजी मारली. जयंत पाटील यावेळी उपस्थित होते.

बैलगाडी शर्यतीचा IPL प्रमाणे थरार, हरण्या बैलाने कशी जिंकली शर्यत, पाहा Video
Follow us on

शंकर देवकुळे, सांगली : सांगलीवाडी लक्ष्मी फाटा येथील श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सांगलीवाडी येथील मानाची बैलगाडी शर्यत रोमहर्षक झाली. या बैलगाडी शर्यतीमध्ये कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या हरण्या बैल जोडीने प्रथम क्रमांकाचे एक लाखाचे बक्षीस मिळवले. या स्पर्धेसाठी बैलगाडी घोडागाडी शर्यत शौकिनांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती. सांगलीवाडी येथील हिंदवी जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित कोळी यानी या शर्यतीचे आयोजन केले होते.

११ बैलगाड्यांनी घेतला भाग


सांगलीवाडी येथील या रोमहर्षक शर्यतीत ११ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. खुल्या अ गटात कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या हरण्या बैलाने प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर द्वितीय क्रमांक डफळापूरच्या आविनाश माने यांच्या बैल जोडीने मिळवला. त्यांना 75 हजाराच बक्षीस ढाल,निशान आणि गाडी चालकास चांदीचे कडे देण्यात आले. तृतीय क्रमांक तासगावच्या प्रमोद थोरात यांच्या बैल जोडीने मिळवला. त्यांना 51 हजार 23 रुपये ढाल, निशाण व गाडीचालकास चांदीचा कडे देण्यात आले. या शर्यतीचा प्रारंभ माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

एलईडी स्क्रीन अन् ड्रोनने चित्रीकरण


क्रिकेटमधील रोमांच असलेल्या आयपीएलला आजपासून सुरुवात होत आहे. त्यापूर्वीच आयपीएलपेक्षाही चांगला रोमांच सांगलीकरणांना दिसला. हा रोमांच डोळ्यात साठवता यावा, यासाठी संपूर्ण शर्यतीचे ड्रोणच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात येत होते. प्रेक्षकांना शर्यत पाहता यावी यासाठी एलईडी स्क्रीनची सोय करण्यात आली होती. अभिजीत कोळी यांच्या हिंदवी जनसेवा फाउंडेशन सांगली वाडी यांच्या वतीने या बैलगाडी व घोडा गाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

हजारोंचा जनसमुदाय

सांगलीवाडीच्या शिवारात बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजारोच्या संख्यने जनसमुदाय आला होता. शिवाय बैलजोड्यांची संख्याही यंदा चांगली होती.  येथील वातावरण आणि तरुणांचा उत्साह हा बैलगाडा शर्यतीबद्दलचे प्रेम सांगण्यापुरता पुरेसा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  जयंत पाटील यांनी सांगितले. तर महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शर्यत किती लोकप्रिय आहे याचे मुर्तीमंद उदाहरण या शर्यती वरून दिसून आल्याचे ते म्हणाले.

बैलगाडी शर्यतीमुळे ग्रामीण अर्थकारणावरही परिणाम

बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यापासून नियम-अटींची पूर्तता करीत या शर्यती पार पडल्या जात आहेत. या केवळ शर्यतीच नाही तर शर्यतीच्या आयोजनामुळे ग्रामीण अर्थकारणावर अनुकूल परिणाम झाला आहे. शर्यतीच्या ठिकाणी लाखोंची उलाढाल होत आहे तर बैलजोडीला पुन्हा महत्व प्राप्त झाले आहे. शर्यतीसाठी खिलार बोल जोडीला मागणी असते. त्यामुळे खिलार बैलजोडीच्या किंमती ह्या लाखोंच्या घरात गेल्या आहेत. शिवाय जनावरांचे आठवडी बाजार भरत असून पुन्हा बैलजोडीला महत्व प्राप्त झाले आहे.