योगेश बोरसे, पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन वाहतूक पोलिसांना आपली ओळख दाखवण्याचे काम अनेक जण करतात. मग राजकीय नेत्याची किंवा मोठ्या अधिकाऱ्याची ओळख दाखवून दंड भरण्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आता हा फंडा चालणार नाही. तुमची ओळख कमी येणार नाही. पुणे पोलीस तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. त्यासाठी पोलिसांच्या वाहनांवर कॅमेरे बसवण्यात येणार आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कारवाई होणार आहे. यामुळे आता वाहतूक नियमांचे पालन करा अन्यथा दंड भरुन द्या, हाच पर्याय वाहन धारकांपुढे असणार आहे.
पुणे पोलीस दलातील पोलिसांच्या वाहनांवर बसवलेल्या कॅमेऱ्यांद्वारे चालकांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर पोलिसांच्या वाहनांवर बसविलेल्या आधुनिक कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नियम मोडल्यानंतर वाहन चालकांना दंड भरावा लागणार आहे. वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६ लाख ३४ हजार ६३१ वाहनचालकांवर मागील वर्षात दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात दहा शासकीय वाहनांमध्ये कॅमेरे बसवण्यात येणार आहे. त्याद्वारे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर इतर वाहनांवर कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. वाहतूक नियम मोडल्यामुळेच अपघात वाढत असतात. मागील वर्षी पुणे शहरात ३१५ जणांचा अपघातात मृत्यू झाला होता. तसेच ४५२ जण गंभीर जखमी झाले होते. तसेच ६० किरकोळ अपघातांची नोंद करण्यात आली होती.
पुणे शहर दुचाकीचे शहर आहे. पुणे शहरात २०१९ पासून आत्तापर्यंत १११८ जणांचा अपघाती मृत्यू झाला. या वर्षात आत्तापर्यंत पुणे शहरात १८० अपघातात १८९ जणांचा मृत्यू झाला आहे.