रणजित जाधव, पुणे | 23 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहराचा विस्तार वाढल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीची अधिक गरज निर्माण झाली. पुणे शहरातील वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक चांगली करण्यावर भर दिला आहे. आतापर्यंत पुण्यात फक्त पीएमपीएमएलची बस हा पर्याय होता. परंतु आता मेट्रो सुरु झाली आहे. पुणे मेट्रोचे दोन टप्पे १ ऑगस्टपासून सुरु झाले आहे. वनाज ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी ते शिवाजीनगर या दोन मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आता पुणेकरांसाठी आणखी एक मार्ग केंद्र सरकारने मंजूर केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गीला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. पिंपरी ते शिवाजीनगर हाच मार्ग मेट्रोकडून पूर्ण करण्यात आला होता. त्यावेळी पिंपरी चिंचवडकर नागरिकांकडून पिंपरी चिंचवड ते निगडीपर्यंत मेट्रो सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर या मागणीला २३ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला. यामुळे पुणेकरांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे.
पिंपरी चिंचवड ते निगडी हा मार्ग 4.4 किलोमीटरचा असणार आहे. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी, निगडी ही स्थानके असणार आहेत. या मार्गामुळे आता निगडीमधील नागरिकांना मेट्रोने थेट स्वारगेट गाठता येणार आहे. सध्या मेट्रो पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगरपर्यंत मेट्रो सुरु आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट या मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. हा मार्ग भुयारी आहे. तसेच लक्ष्मी रोड आणि मंडई या भागातून जाणार आहे. येत्या एप्रिल महिन्यापर्यंत हा मार्ग पूर्ण होणार आहे. हा मार्ग पूर्ण झाला आणि पिंपरी चिंचवड ते निगडी मार्गही झाला तर निगडीवरुन थेट स्वारगेट मेट्रोने प्रवास करता येणार आहे. त्याचा फायदा पुणे शहर आणि निगडीमधील अनेकांना होणार आहे.