पुणे: खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्याचं स्वागत आहे. मराठा आरक्षणासाठी जे जे आंदोलन करतील त्यांना आमचा पाठिंबा राहील हे आम्ही आधीच सांगितलं आहे. उद्या शरद पवारांनी आंदोलन केलं तर आम्ही त्यांच्याही पाठी उभे राहू. संभाजीराजे तर आमचे राजे आहेत. नेते आहेत. त्यामुळे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही महाराजांना मदत करायला तयार आहोत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. (chandrakant patil reaction on sambhaji chhatrapati’s Maratha Reservation morcha)
चंद्रकांत पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. संभाजीराजेंच्या घोषणेचं आम्ही स्वागत करत आहोत. मराठा आरक्षणासाठी कोणीही आंदोलन करत असेल तर भाजप स्वत:चा झेंडा न घेता या आंदोलनात उतरेल हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण आणि तात्काळ सवलती मिळून देण्यासाठी जे जे लोक आंदोलन करतील त्यांच्या पाठी आम्ही उभे राहू. उद्या शरद पवारांनी आंदोलन केलं तर त्यांच्याही पाठी आम्ही उभे राहू. महाराज तर आमचे नेते आहेत. आमचे राजे आहेत. त्यामुळे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही महाराजांना मदत करायला तयार आहोत, असं पाटील म्हणाले.
संभाजीराजेंना आमचं काही सहकार्य हवं असेल तर आम्ही त्यांना मदत करू. आम्ही आंदोलनात आलो तर राजकीय रंग लागू शकतो. आमच्या हातात झेंडा नसला तरी आमची आयडेंटीटी गडद आहे. त्यामुळेच आमचं सहकार्य असेल तर आम्ही त्यांना मदत करायला तयार आहोत. आम्हाला महाराजांचं नेतृत्व मान्य आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी टीका केली. अजित पवारांच्या वाक्यात दांभिकपणा आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केस नीट चालवली नाही, असं मराठा समाज म्हणत आहे. सरकारने सारख्या तारखा मागितल्या. त्यामुळे कायद्याला स्टे आला. आरक्षण रद्द झाल्यापासून पुनर्विचार याचिका दाखल करा, असं आम्ही सांगत आहोत. पण सरकारने अजून कोणताही निर्णय घेतला नाही. आता आयोग नेमलाय. त्याला स्टाफ आणि बळ पुरवा, असा टोला त्यांनी लगावला. (chandrakant patil reaction on sambhaji chhatrapati’s Maratha Reservation morcha)
प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा पत्रकारांशी संवाद. https://t.co/KPdrEIHaWI
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 6, 2021
संबंधित बातम्या:
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची पेट्रोल पंपावर निदर्शने; सोमवारी 1 हजार ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन
अशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल, भाजप मागणार नाही: चंद्रकांत पाटील
(chandrakant patil reaction on sambhaji chhatrapati’s Maratha Reservation morcha)