पुणे : “माझ्यावर शाईफेक हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे”, अशी भूमिका राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली. “मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो, कायदा हातात घेऊ नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला कायदा हातात घेणं शिकवलं नाही”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. चंद्रकांत पाटील यांच्यावर आज पिंपरीत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली.
चंद्रकांत पाटील आज पिंपरीत मोरया गोसावी या गणपती देवस्थानाच्या संजीवन समाधी सोहळ्याला हजेरी लावणार होते. या दरम्यान एका कार्यकर्त्याच्या घरी आले असता एका अज्ञात व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. त्यानंतर ते प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपली भूमिका मांडली.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
“बाबासाहेबांनी घटना लिहिली. मी पैठणला जे बोललो त्याचा विपर्यास झाला. आणि मी प्रचंड मोठ्या गर्दीत वंदे मातरम सभागृहाच्या उद्घाटनात असं म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर 100 मार्कांचा अभ्यासक्रम केला पाहिजे. दोन पानी धडा काय शिकवता?”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
“पुढे जाऊन मी म्हणालो की, बाबासाहेब आंबेडकर ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत, ज्यांनी घटना लिहिली, ती घटना पुढचे एक हजार वर्ष बदलावी लागणार नाही. काय झाल्यास काय करावं म्हणजे घटना. ते तुम्ही प्रेसवाल्यांनी नाही दाखवलं”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“माझा तुम्हाला दोष नाही. पण तुम्ही पैठणला म्हटलेल्या वाक्याचा विपर्यास करुन महाराष्ट्र पेटवला, मी तुमच्यावर आरोप करत नाही. पण तुम्ही पराचा कावळा केला नसता तर तिथे कोण होतं? वंदे मातरम सभागृहाचं उद्घाटन करताना बाबासाहेबांची प्रचंड स्तुती केली ते तुम्ही दाखवलं नाही. मी पैठणलाही बाबासाहेबांची स्तुती केली”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.
‘हिंमत असेल तर समोर या’
“मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सगळे कार्यक्रम करणार आहे. मी चळवळीतला माणूस आहे. मी कुणाला घाबरत नाही. अशाप्रकारे पराचा कावळा करणं, त्याचं तीन-तीनवेळा स्पष्टीकरण दिल्यानंतरही, दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही हा भ्याडपणा, अरे हिंमत असेल तर समोर या. चला सर्व पोलीस डिपार्टमेंटला बाजूला करु”, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं.
“अरे काय चाललंय? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला एका अर्थाने त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे जपलं की एखाद्या गोष्टीचा विरोध हा लोकशाही मार्गाने करायचा, पण ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“या शाईफेकीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतील. पण ही झुंडशाही चालणार नाही. आज समजा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना खुली छूट दिली असती तर हे केवढ्यात पडलं असतं? पण आम्ही आमची संस्कृती सोडणार नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“शब्दाला शब्दाने टक्क देता येते. मी लगचे पत्रकार परिषद घेऊन माझं असं म्हणण्याचा हेतूच नाही, असं स्पष्ट केलंय. खरंतर गिरणी कामगाराचा मुलगा इथपर्यंत जाणं हे सरंजामशाहीवाल्यांना झेपत नाहीय. त्यामुळेच भ्याड हल्ले चालले आहेत. उद्यापासून पोलिसांची सुरक्षा नसेल. हिंमत असेल तर समोर या”, असं आव्हान त्यांनी दिलं.
“पोलिसांना दोष देण्याचं कारण नाही. मी पोलिसांना दोष देणार नाही. कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात आले होते. पोलीस कुठे-कुठे लक्ष देणार? मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलंय की, कुणावरही कारवाई करु नका”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.