पुणे : वाहतूक पोलिसांनी 14 एप्रिल (गुरुवार) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar jayanti) रस्ते बंद (Road) करण्याची आणि वाहतूक वळवण्याची रुपरेषा जाहीर केली आहे, कारण संपूर्ण शहरात मोठे मेळावे आणि समारंभ होणार आहेत. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. पुणे कॅम्पमधील (Pune camp) जिल्हाधिकारी कार्यालय (Collector office), विश्रांतवाडी (Vishrantwadi) आणि अरोरा टॉवर्स परिसरात तीन मुख्य मेळावे होतील, अशी पोलिसांची अपेक्षा आहे. शाहीर अमर शेख चौक ते मालधक्का चौकापर्यंतची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. ती आरटीओ चौक, जहांगीर चौक मार्गे वळवण्यात येणार आहे. जीपीओ चौकाकडून बोल्हाई चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवून ती किराड चौक, नेहरू स्मारक चौकातून वळवण्यात येणार आहे. पुणे स्टेशन ते मालधक्का चौकापर्यंतची वाहतूक बंद राहणार आहे. नरपतगिरी चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवून ती कमला नेहरू रुग्णालय, कुंभारवेस चौक मार्गे वळवण्यात येणार आहे.
शाहीर अमर शेख चौकाकडून बॅनर्जी चौकाकडे जाणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक, पवळे चौक मार्गे वळवण्यात येणार आहे. हे वाहतूक बदल 14 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतील आणि गर्दी कमी होईपर्यंत ते लागू राहतील. कोयाजी रोडवरून पुणे स्टेशनकडे जाणारी वाहतूक तीन तोफा चौकात बंद करून एसबीआय हाऊस चौकमार्गे वळवण्यात येईल. इस्कॉन मंदिर ते अरोरा टॉवर्सपुढील डॉ. आंबेडकर पुतळ्याकडे जाणारी वाहतूक बंद राहील. नेहरू चौकाकडून तीन तोफा चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून नेहरू चौकातून डावीकडे किराड चौकमार्गे वळवण्यात येईल. हे वाहतूक बदल 14 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतील आणि गर्दी कमी होईपर्यंत लागू राहतील.
शहर परिसरातून पुणे विमानतळ आणि टिंगरे नगर भागाकडे जाणारी वाहने वाणिज्य क्षेत्रातून किंवा येरवडा कारागृह आणि पोस्ट ऑफिसमार्गे वळवली जातील. पुणे शहराकडून बोपखेल, दिघी, आळंदीकडे जाणारी वाहतूक शांतीनगर चौक, कळस फाटा मार्गे वळवण्यात येणार आहे. कळस, बोपखेल, दिघी, आळंदी येथून पुणे शहराकडे जाणारी वाहतूक खडकी येथील कळस फाटा, टाकी रोड मार्गे वळविण्यात येणार आहे. धानोरीकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक आनंद मंगल कार्यालय रोड आणि 509 चौक मार्गे वळवण्यात येणार आहे. पुणे विमानतळावरून खडकी आणि भोसरीकडे जाणारी वाहतूक सिद्धेश्वर चौक, आळंदी रोडमार्गे वळवण्यात येणार आहे. हे वाहतूक बदल 14 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजल्यापासून लागू होतील.
महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानाची प्रतिकृती दांडेकर पूल चौकात बसवण्यात येणार असून त्याला मोठी गर्दी होईल, असा अंदाज वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यासाठी 13 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी सावरकर चौक ते सिंहगड रोडवरील वाहतूक बंद ठेवून सारसबाग चौक, मांगीरबाबा चौक, बाळशिवाजी चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. सिंहगड रोडवरील आशा चौकाकडून सावरकर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवून सेनादत्त चौकी, ना. सी. फडके चौक मार्गे वळवण्यात येईल.
अधिकाऱ्यांनी असेही सांगितले, की शहरात विविध ठिकाणी मिरवणुका असल्याने 14 एप्रिल रोजी आवश्यक असल्यास वाहतूक वेळोवेळी थांबविली जाऊ शकते किंवा वळविली जाऊ शकते. वाहनचालकांना कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांकडून मार्गदर्शन केले जाईल.
आणखी वाचा :