पुणे : चांदणी चौकात (Chandani Chowk) युद्धपातळीवर काम करून उपायोजना केली जाईल. पूल तोडण्याचे काम होईपर्यंत 100 ट्रॅफिक वॉर्डन याठिकाणी तैनात असतील. जड वाहतुकीचे नियोजन करण्यासाठीही उपाययोजना करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चांदणी चौक परिसराची पाहणी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की उद्यापासून मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ याठिकाणी लागणार आहे. सर्व्हिस रोड (Service road) एकमेकांना जोडला जाईल. अधिक लेन सुरू होतील. हद्द नंतर पाहा. आधी नागरिकांना दिलासा द्या, अशा सूचना सर्व विभागांना दिल्याचे शिंदे म्हणाले. मात्र मुख्यमंत्र्यांसमोरच एकेरी मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या सर्व समस्यांवर लवकरच तोडगा निघेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
चौकात काम सुरू असल्याने मुंबईकडून येणाऱ्या एकेरी मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. आता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत. ते चांदणी चौक परिसरात आले. त्यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की परवाच्या दिवशी मी इथून साताऱ्याकडे जात होतो, त्यावेळी येथील प्रवासी मला भेटले. त्यांनी येथील वाहतुकीची जी काही समस्या होती, ती माझ्या कानावर घातली. त्याचवेळी मी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, एनएचएआयचे अधिकारी या सर्व संबंधित विभागाशी फोनवरून संपर्क केला. काल साडेअकरा वाजता ही संपूर्ण टीम याठिकाणी येवून गेली. त्यांनी पाहणी केली, असे ते म्हणाले.
याठिकाणचा मधील पूल आहे, तो काढण्याची आवश्यकता आहे. चांदणी चौकातील वाहतूककोंडीतून स्थानिकांना दिलासा देण्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, ती सर्व तयारी संबंधित विभागांनी केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील सर्व परिसर पाहिला पाहिजे, या हेतूने आलो असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. इथल्या समस्या आहेत. काही बाबी कोर्टात प्रलंबित आहेत. यासर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या हेतूने आमची टीम काम करत आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.