विनय जगताप, पुणे | दि. 9 मार्च 2024 : पुणे शहरातील सिंहगड पर्यटकांप्रमाणे गिर्यारोहकांचेही आवडीचे स्थान आहे. सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर चांगलीच गर्दी होत असते. महाशिवरात्रीला सिंहगडावरील तानाजी कड्याजवळ असलेल्या कड्यात गिर्यारोहक अडकला. तब्बल तीन अडकून पडलेल्या गिर्यारोहकाची स्थानिक युवक आणि सुरक्षारक्षकांनी प्राणांची बाजी लावून दोरखंडांच्या साह्याने सुखरूप सुटका केली. त्यानंतर शुभम माने या गिर्यारोहकाच्या डोळ्यात आनंद आश्रू वाहू लागले.
महाशिवरात्री निमित्त गडाच्या परिसरातील शिवकालीन महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी शुभम माने ( वय २८ चिखली, रा. पिंपरी चिंचवड) सकाळी एकटाच निघाला. अतकरवाडी मार्गावरुन तो सिंहगडावर आला. गडाच्या माथ्यावरील उदयभान समाधी जवळील मार्गाने तो कोळवडी ( ता. वेल्हे) जवळील उंच डोंगरावरील मेंगजाई मंदिराच्या निघाला. मात्र उंच डोंगरावरील मंदिर दूर अंतरावर असल्याने तो अर्धा रस्त्यावरुन माघारी निघाला. गडाच्या पायथ्याहून जुन्या मार्गाने शुभम याने सकाळी साडे दहाच्या सुमारास चढाई सुरु केली. तो तानाजी कड्याच्या लगत असलेल्या तटाखाली अडकून पडला. त्याला पुढे जाता येईना आणि खाली माघारी उतरता येईना. दुर्गम ठिकाणी खोल कड्यात तो अडकला होता.
मदतीसाठी शुभम माने याने जोरात आवाज देणे सुरु केले. त्याचा आवाज ऐकून नरवीर तानाजी मालुसरे समाधीची साफसफाई करणारे तसेच स्थानिक युवक महेश सांबरे, सचिन पढेर, रोहित जोरकर, सचिन भोंडेकर, समीर रांजणे, दत्तात्रय जोरकर , नंदु जोरकर यांनी कड्याच्या माथ्यावर धाव घेतली. दोरखंडाच्या साह्याने युवकांनी तब्बल शंभर फुट खोल दरीतुन शुभम याला बाहेर काढले. त्याच्या हातापायाला खरचटल्याने जखमा झाल्या होत्या. सिंहगड किल्ल्याच्या अतीदुर्गम तानाजी कड्याजवळ शुभम माने तब्बल तीन अडकून पडला होता.
तब्बल तीन तास शुभम हा कड्यात अक्षरशः मृत्युशी झुंज देत होता. महाशिवरात्री उपवासामुळे तो व्याकुळ झाला होता. सुरक्षा रक्षक, युवकांनी त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील, संदीप कोळी, वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष पांडुरंग सुपेकर आणि ग्रामस्थांनी प्राणांची बाजी लावणाऱ्या युवकांचे अभिनंदन केले.
शुभम हा निष्णात गिर्यारोहक आहे. पण महादेवाचे मंदिर समजुन तो राजगड मार्गावरील मेंगजाई मंदिराकडे निघाला होता. मात्र मंदिर दूर असल्याने तो पुन्हा गेलेल्या मार्गाने गडावर चढाई करत होता. त्यानंतर भरकटत दुर्गम कड्यात गेला, असे महेश सांबरे यांनी सांगितले.