प्रदीप कापसे, पुणे, दि.22 डिसेंबर | राज्यात आता अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यातील अनेक शहरांचे तापमान सातत्याने 10 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान आले आहे. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागासह शहरी भागात शेकोट्या पेटविल्या जात आहे. आता हवामान विभागाने थंडीसंदर्भात अपडेट दिले आहे. पुढील 48 तासांत महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. थंडीचा हा जोर वर्षाच्या अखेरपर्यंत कायम राहणार आहे. अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे थंडी निर्माण झाली आहे. सध्या उत्तरेकडे थंड वारे सुरु असून त्याचा प्रवास राज्याचा दिशेने सुरु झाला आहे. या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. थंडी आणण्यासाठी कमी दाबक्षेत्रेही सध्या मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात अस्तित्वात येत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार आहे. पुणे शहरात सकाळच्या धुक्यातही वाढ झाली आहे. पुण्यात ही थंडीचा प्रभाव जाणवत आहे. पुणे शहराचे तापमान १४. ९ अंशावर आहे. राज्यात सर्वात कमी तापमान विदर्भात नोंदवले गेले. गोदिंयाचे तापमान ९ अंश सेल्सियस होते. मुंबईतील तापमान २३.२ अंशावर आले असली तरी सकाळी गार वारे वाहत आहेत. यामुळे समुद्र किनारी फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नागपूरचे तापमान १०.६ तर नाशिकचे तापमान १५ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले.
राज्यात गेल्या चार पाच दिवसापासून थंडीचा जोर वाढला आहे. यामुळे रब्बी पिकाला फायदा होणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसाच्या ओलांव्यामुळे गव्हामध्ये पिवसळपणा जास्त प्रमाणात दिसून येत होता. मात्र, आता थंडीची चाहूल लागताच गव्हाचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे. तापमानात सातत्याने चढउतार होत असल्याने काही भागात दाट धुके सुद्धा पडत आहे. या धुक्यांमुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, कडाक्याच्या थंडीमुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात तरी निसर्गाची साथ मिळेल अशी अपेक्षा वाढली आहे.