मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. त्या योजनेसाठी राज्यभरातील सेतू कार्यालये आणि तहसील कार्यालयात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या योजनेवर उपरोधिक टीका विरोधकांकडून सुरु आहे. पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहे. यामुळे पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अनोखी उपरोधिक बॅनरबाजी सुरु आहे. मुख्यमंत्री माझा लाडका खड्डा योजना २०२४ नावाने स्पर्धा भरवली आहे. त्याचे बॅनर शहरात लावले आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या बॅनर शेजारीच हे बॅनर लावले आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
पुणे शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाव साधर्म्य करुन सर्वोत्कृष्ट धोका खड्डानाथ, सर्वोत्कृष्ट बारा खड्डादादा आणि सर्वोत्कृष्ट मोठा खड्डेंद्र असे बक्षिस ठेवल्याचे बॅनर लागले आहे. राज जाधव आणि संकेत गलांडे यांनी हे बॅनर लावले आहेत.
आपल्या भागातील अत्यंत धोकादायक खड्डा पाठवण्याचे आवाहन काँग्रेसने केले आहे. या स्पर्धेत सहभागी घेतलेल्या नागरिकांना जागरूक नागरिक पुरस्कार दिला जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच अत्यंत तीन धोकादायक खड्डे पाठवून जीव वाचवल्याबद्दल पंधराशे रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे. या तीन खड्ड्यांनी काँग्रेसने खड्डानाथ, खड्डादादा, खड्डेंद्र…अशी नावे दिली आहेत. महायुती सरकारवर जोरदार टीका काँग्रेसने केली आहे.
पुण्यात काँग्रेसची बॅनरबाजी
नागरिकांनी पाठवलेले खड्डे महापालिकेकडून दुरुस्त केले गेले नाही, तर आम्ही ते स्वतः दुरुस्ती करु, असे या बॅनर्सवर म्हटले आहे. पुण्यातील खड्ड्यांचा विषय त्यामुळे चर्चेत आणण्यात आला आहे. दुसरीकडे पुणे मनपाने खड्डा बुजण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. त्या क्रमांकावर फोटो पाठवल्यावर २४ तासांत खड्डा बुजवला जाणार असल्याचे पुणे मनपाने म्हटले आहे.
रस्त्यावर खड्डा निर्माण झाला, उचला मोबाईल व्हॉट्सअॅपद्वारे करा तक्रार, 24 तासांत दुरुस्ती