भोर, पुणे : राजगड सहकारी साखर कारखान्यावर (Rajgad sahakari sakhar karkhana) पुन्हा एकदा काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंचेच वर्चस्व राहणार, हे स्पष्ट झाले आहे. कारखान्याच्या 17 संचालकपदाच्या निवडणुकीसाठी (Election) 45 अर्ज आले. या अर्जांपैकी 14 उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरले. त्यामुळे काँग्रेसचे (Congress)14 उमेदवार बिनविरोध होणार आहेत. अर्ज माघार घेण्याची मुदत 18 मेपर्यंत असून 19 मेला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 29 मेला उर्वरित जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. सद्य स्थितीत कारखान्याच्या 17 संचालकपदाच्या जागांसाठीच्या निवडणुकीत, 14 जणांचे अर्ज अवैध ठरविले गेले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे 14 उमेदवार बिनविरोध होणार, हे स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम काँग्रेस आमदार संग्राम थोपटेच राजगडचे किल्लेदार राहणार आहेत.
या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी भोर यांच्या कार्यालयात 25 ते 29 एप्रिल या काळात दाखल करण्यात आले होते. याची छाननी करून जे नामनिर्देशन पत्र ग्राह्य झाले, त्याची यादी 4 मेला निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारांना नामनिर्देशनपत्र 5 ते 18 मे या काळात मागे घेता येतील. निवडणूक चिन्हाचे वाटप 19 मेला होणार आहे. मतदान 29 मेला होऊन मतमोजणी आणि निकाल 31 मेला घोषित करण्यात येणार आहे. यासाठी भोर विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
राज्यातील सर्वच साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यादृष्टीकोनातून राजगड सहकारी साखर कारखानाही नाजूक स्थितीत आहे. मात्र आम्ही सर्वांच्या सहकार्यातून कारखाना सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संग्राम थोपटे म्हणाले आहेत. राजकीय विरोधक कोंडी करत असले तरी सर्वांच्या प्रयत्नाने त्यावर मात करू, असे त्यांचे म्हणणे आहे.