Pune | ‘आपल्याकडे संघटना नाही, मतभेत बाजूला ठेऊन एकत्र या’, काँग्रेसच्या प्रभारींची कळकळीची विनंती

| Updated on: Jan 23, 2024 | 6:33 PM

काँग्रेस पक्षाची आज पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर काँग्रेसची सभा पार पडली. यावेळी रमेश चेन्निथला यांनी आपल्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती केली.

Pune | आपल्याकडे संघटना नाही, मतभेत बाजूला ठेऊन एकत्र या, काँग्रेसच्या प्रभारींची कळकळीची विनंती
Follow us on

विनय जगताप, Tv9 मराठी, पुणे | 23 जानेवारी 2024 : काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची आज पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर सर्व नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. काँग्रेसच्या या सभेला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एक कळकळीची विनंती केली. “आपल्याकडे संघटना नाहीय. येणाऱ्या निवडणुकांना आपल्याला समोरं जायचं आहे म्हणून आज ही बैठक घेण्यात आली. माझं सर्वांना आवाहन आहे, सगळ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आपापले मतभेत बाजूला ठेऊन एकत्र येऊन कामं करण्याची वेळ आली आहे”, असं रमेश चेन्निथला म्हणाले.

“गांधी आणि नेहरू यांच्या नेतृत्वाखाली आपण त्यावेळेस लढाई लढली आणि ती जिंकली. मंदिर, मशीद, गुरुद्वार बनवणं हे काय सरकारचं कामं आहे का? जनतेचे प्रश्न सोडवणं हे सरकारचं काम आहे. सरकार काय कुणा एका धर्माचं आहे का? रामाला आम्ही सगळे मानतो, राम सगळ्यांचा आहे”, असं रमेश चेन्निथला म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कालचं भाषण हे येणाऱ्या निवडणुकांसाठी होतं. हे असं भाषण अशा वेळेस करणं योग्य आहे का? शंकराचार्य यांनी मंदिर अर्धवट असल्यानं विरोध केला, ते गेले नाहीत. पण ह्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवकाचे प्रमुख मोहन भागवत यांना बोलावलं. मंदिरात उद्घाटनासाठी बसवलं. ते त्या ठिकाणी कसं कायं उपस्थित होते याचं कोणीही उत्तर दिलं नाही”, अशी टीका रमेश चेन्निथला यांनी केली.

‘पक्षाने आपल्याला खूप काही दिलं, आता आपण करण्याची वेळ’

“काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आम्ही सगळे पक्ष एकत्र मिळून निवडणूक लढवू. येणाऱ्या काही दिवसांत जागा वाटपाची अंतिम यादी आपल्यासमोर येईल. आपल्या सर्वांना एकजूट होऊन कामे करण्याची गरज आहे. पक्षाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. आता पक्षाला आपल्याला काहीतरी देण्याची गरज आहे”, असं रमेश चेन्निथला कळकळीने म्हणाले.

दरम्यान, यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. “अतिशय चांगली आढावा बैठक आज झाली. यानंतर 6 विभागीय बैठका होणार आहेत आणि नंतर लोणावळा येथे शिबिर होईल. येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष निवडणूक लढणार की संघटनात्मक निवडणुका लढायच्या हे ठरवणं महत्वाचं आहे. बुथ कमिट्या निर्माण करणं गांभीर्याने घ्या”, असे आदेश पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिले.